प्यारवाली लव्हस्टोरी! भाजीवाल्याच्या प्रेमात पडली फिलीपिन्सची तरुणी, भाषेचा अडथळा होता पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:44 IST2025-03-03T13:43:50+5:302025-03-03T13:44:20+5:30
परदेशातून एक मुलगी चक्क तिच्या प्रेमासाठी थेट भारतात आली.

प्यारवाली लव्हस्टोरी! भाजीवाल्याच्या प्रेमात पडली फिलीपिन्सची तरुणी, भाषेचा अडथळा होता पण...
आजकाल आपण सोशल मीडियावर अशा अनेक लोकांशी जोडलेलो असतो, ज्यांच्यासोबत कधीही न भेटता एक खास नातं तयार होतं. सोशल मीडियावरील मैत्रीचं रुपांतर खऱ्या प्रेमात झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक हटके लव्हस्टोरी समोर आली आहे. परदेशातून एक मुलगी चक्क तिच्या प्रेमासाठी थेट भारतात आली.
गुजरातमधील एका भाजी विक्रेत्याची लव्हस्टोरी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तरुणी त्याच्यावरच्या प्रेमासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात पोहोचली.फेसबुकवरून भाजीविक्रेत्याची तरुणीशी ओळख झाली. नंतर मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यांच्यामध्ये भाषेचा अडथळा होता. पिंटू आणि फिलीपिन्समधील या मुलीने बहुतेकदा इमोजी आणि व्हिडीओ कॉलद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
पिंटूने सांगितलं की, त्याला इंग्रजी नीट बोलता येत नव्हतं, पण मुलीच्या स्मितहास्याने सर्व काही सांगितलं. त्याच वेळी, या मुलीला पिंटूचा साधा स्वभाव, दयाळूपणा आणि प्रामाणिकपणा इतका आवडला की तिने तिच्या मनाचं ऐकलं आणि गुजरातला येण्याचा मोठा निर्णय घेतला. या अनोख्या लव्हस्टोरीने आता सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. इन्स्टाग्रामवर "storiyaan_" नावाच्या अकाउंटवरून ही लव्हस्टोरी शेअर करण्यात आली आहे.
एके दिवशी पिंटूने मुलीला एक पार्सल पाठवलं, ज्यामध्ये एक खास भेट होती. याद्वारे त्याने तिला प्रपोज केलं. जेव्हा मुलीने व्हिडिओ कॉलवर पार्सल उघडलं तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने लगेच होकार दिला, पण त्यानंतरही दोघेही दोन वर्षे वेगळे राहिले. त्यानंतर पिंटू फिलीपिन्सला गेला आणि मुलीच्या कुटुंबाला भेटला. त्याचा साधा आणि प्रामाणिक स्वभाव पाहून कुटुंबालाही तो आवडू लागला. अखेर दोघांनी ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने लग्न केलं.