३ वर्षांचा अनुभव असणाऱ्या इंजिनिअरचा १० पटीने वाढला पगार; एका मुलाखतीमुळे मिळाला १.६ कोटी रुपयांचा CTC!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 15:09 IST2025-10-05T15:06:37+5:302025-10-05T15:09:41+5:30
सोशल मीडियावर एका युजरने शेअर केलेल्या पगार वाढीची पोस्ट व्हायरल होत आहे.

३ वर्षांचा अनुभव असणाऱ्या इंजिनिअरचा १० पटीने वाढला पगार; एका मुलाखतीमुळे मिळाला १.६ कोटी रुपयांचा CTC!
Social Viral: सोशल मिडिया हे सध्याच्या काळात माहितीच्या देवाणघेवाणीसाठी एक शक्तिशाली व्यासपीठ बनले आहे. ब्रेकिंग न्यूजपासून ते सेलिब्रिटींच्या लाईफस्टाईलपर्यंत, शिक्षणाच्या बातम्यांपासून ते नोकरी आणि पगाराच्या पॅकेजपर्यंत, सर्वकाही काही मिनिटांत सोशल मीडियावर व्हायरल होतंय. अशातच एका टेक प्रोफेशनलच्या एका गोष्टीमुळे सोशल मीडिया युजर्संना धक्का बसला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याच्या पगारात झालेली भरघोस वाढ. तीन वर्षांपूर्वी तो सॅमसंगमध्ये १६ वार्षिक पगारावर काम करत होता आणि आता त्याला लिंक्डइनकडून १.६ कोटी वार्षिक पगाराची ऑफर देण्यात आली आहे.
भारतातील एका छोट्या शहरातील महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या एका टेक प्रोफेशनलच्या पगारवाढीमुळे ऑनलाइन जोरदार चर्चा सुरु झालीय. एका पोस्टमध्ये दावा केला जातोय की, तीन वर्षांत या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पगार १६ लाखांवरून १.६ कोटी झाला आहे म्हणजेच १० पट वाढ. सोशल मीडिया युजर्स हे विशेषतः आयटी कर्मचारी या बातमीने थक्क झाले आहेत. ते टेक प्रोफेशनलच्या करिअर रोडमॅप आणि मुलाखतीच्या तयारीसाठी टिप्स विचारत आहेत.
वैभव अग्रवाल नावाच्या एका युजरने सोशल मीडियावर त्याच्या मित्राचे पगार पॅकेज शेअर केले. त्या दोघांनीही त्यांचे करिअर एकत्र सुरू केले होते आणि आज त्याच्या मित्राचा पगार कोटींमध्ये आहे. वैभव अग्रवालने सांगितले की ते सॅमसंगमध्ये सहकारी होते. नंतर ते वेगळे झाले. अग्रवाल सध्या गुगलमध्ये काम करत आहेत, तर अनामिक सॉफ्टवेअर इंजिनिअरला लिंक्डइन या मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर १.६ कोटी पगारासह वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली आहे.
"माझ्या मित्राने अलिकडेच लिंक्ड एसएसई (सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर) मुलाखत उत्तीर्ण केली आणि त्याला ₹९५ लाख वार्षिक पॅकेज (एलपीए) आणि सीटीसी (कॉस्ट-टू-कंपनी रेशो) अंदाजे १.६ कोटी मिळाले. तो २०२२ मध्ये पदवीधर झाला आणि तो एका टियर ३ कॉलेजचा पदवीधर आहे. तो माझ्यासोबत सॅमसंगमध्ये सुमारे १६ लाख वार्षिक पगाराने काम करत होता. पगारात ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे," असं वैभव अग्रवालने म्हटलं.
टियर १ मध्ये भारतातील काही मोठी शहरे समाविष्ट आहेत, जसे की मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू. टियर २ मध्ये मोठ्या शहरांशी स्पर्धा करण्यासाठी सतत प्रगती करणारी शहरे समाविष्ट आहेत. टियर ३ शहरे ही लहान, विकसनशील शहरी आहेत. वैभवच्या या पोस्टवर एका युजरने तुझ्या मित्राचा रोडमॅप आणि मुलाखतीच्या तयारीसाठीच्या टिप्स तुम्ही शेअर करू शकाल का? असं म्हटलं आहे.