जरा विचार करा, ज्या आईने आयुष्यभर आपल्या मुलांसाठी संघर्ष केला, तीच आई उतारवयात गर्दीच्या ठिकाणी एकटी बसून रडत असेल तर? कॅमेऱ्यासमोर थरथरणारा आवाज, ओले डोळे आणि मदतीसाठी केलेली आर्त हाक – हे कोणतेही चित्रपटामधील दृश्य नसून, एक असा व्हिडीओ आहे ज्याने लोकांचं काळीज पिळवटून टाकलं आहे. हे प्रकरण केवळ एका वृद्ध महिलेच्या हतबलतेपुरतं मर्यादित नसून, जबाबदाऱ्या जेव्हा ओझं वाटू लागतात, त्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभं करतं. एखादा मुलगा आपल्या आईला अशा अवस्थेत कसं सोडू शकतो असा प्रश्न पडला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये सुमारे ८० वर्षांची एक वृद्ध महिला गजबजलेल्या बस स्टॉपवर एकटी बसलेली दिसत आहे. ही महिला रडत रडत वाटसरूंकडे मदतीची याचना करताना दिसते, ज्यामुळे तिच्याच कुटुंबाने तिला सोडल्याचा आरोप केला जात आहे. व्हिडीओ बनवणारी व्यक्ती असा दावा करत आहे की, ही महिला एका शिक्षकाची आई आहे आणि कौटुंबिक वादानंतर तिला घराबाहेर काढण्यात आलं आहे. असं सांगितलं जात आहे की, ही महिला आपल्या मुलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होती. मात्र या सर्व दाव्यांची अद्याप अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. असं असलं तरी या व्हिडिओमुळे वृद्धांसोबत होत असलेल्या गैरवर्तणुकीबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
व्हिडिओमध्ये ती महिला आपल्या सामानाजवळ बसलेली असून अत्यंत थकलेली, घाबरलेली आणि कोलमडलेली दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरची भीती आणि डोळ्यांतील अश्रू स्पष्टपणे जाणवत आहेत. आजूबाजूने जाणारे लोक काही क्षण थांबून तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करताना दिसत आहेत. याच दृश्याने सोशल मीडिया युजर्सना हादरवून सोडलं आहे. जी आई आयुष्यभर मुलांचा आधार बनली, तिला या वयात असं एकटं कसे सोडलं जाऊ शकतं, असा सवाल लोक विचारत आहेत.
मोठ्या संख्येने लोकांनी याचा निषेध करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनेक युजर्सनी आठवण करून दिली की, कायद्यानुसार पालकांची काळजी घेण्याची जबाबदारी मुलांवर निश्चित करण्यात आली आहे आणि याचं उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद आहे. असं असूनही अशा घटना समोर येणं हे कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उभं करतं. लोकांनी प्रशासन आणि समाजकल्याण विभागाकडे या प्रकरणाची चौकशी करून वृद्ध महिलेला तातडीने मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
Web Summary : An 80-year-old woman was abandoned by her son at a bus stop, sparking outrage. The viral video shows her pleading for help, highlighting elder abuse and raising questions about filial responsibility. The incident has prompted calls for investigation and immediate assistance.
Web Summary : एक 80 वर्षीय महिला को उसके बेटे ने बस स्टॉप पर छोड़ दिया, जिससे आक्रोश फैल गया। वायरल वीडियो में वह मदद की गुहार लगा रही है, जो बुजुर्गों के दुर्व्यवहार को उजागर करता है और पारिवारिक जिम्मेदारी पर सवाल उठाता है। घटना ने जांच और तत्काल सहायता की मांग की है।