कमाल! "जितके हवे तितके पैसे घ्या...", टेबलवर ठेवले ७० कोटी; बोनस देण्याची भन्नाट पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:41 IST2025-01-30T12:40:38+5:302025-01-30T12:41:27+5:30
कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने बोनस वाटप केलं की जगभरात त्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.

फोटो - आजतक
एका चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने बोनस वाटप केलं की जगभरात त्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. 'हेनान मायनिंग क्रेन कंपनी लिमिटेड' असं नाव असलेली ही चिनी फर्म क्रेन बनवते. एका टेबलावर ६० मिलियन युआन (७० कोटी रुपयांपेक्षा जास्त) ठेवले आणि कर्मचाऱ्यांना सांगितलं की ते मोजू शकतील तितका बोनस घ्या आणि घरी जा.
१५ मिनिटांची टाइमलाइन
रिपोर्टनुसार, हेनान मायनिंगकडून कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची ही पद्धत सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. क्रेन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक टाइमलाइन दिली. कंपनीने सांगितलं की तुमच्याकडे १५ मिनिटं आहेत, या काळात जितके हवे तितके पैसे घ्या. यासाठी कंपनीने प्रत्येकी ३० कर्मचाऱ्यांच्या टीम तयार केल्या होते आणि प्रत्येकाला आळीपाळीने संधी दिली होती.
कंपनीने २५ जानेवारी रोजी हा विशेष बोनस वितरित केला. सहसा जेव्हा एखादी कंपनी बोनस देते तेव्हा कर्मचारी आनंदी होतात आणि जर हा बोनस कोणत्याही मर्यादेशिवाय असेल तर काय म्हणता येईल? या अनोख्या बोनसचा व्हिडीओ चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'डौयिन' आणि 'वेइबो' वर व्हायरल होत आहे. टेबलावर पैसे पसरवून बोनस वाटण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा युजर्सनी यावर भन्नाट कमेंट केल्या आणि त्यापैकी बहुतेकांनी बॉसचं आणि कंपनीचं कौतुक केलं.