१ मिनिटाचा उशीर, प्रवाशाच्या समोरच वंदे भारत ट्रेन सुटली; लोको पायलटला विनंती केली, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:20 IST2025-12-16T12:11:47+5:302025-12-16T12:20:53+5:30
Vande Bharat Train Viral Video: वंदे भारत ट्रेनला स्वयंचलित दरवाजे असल्यामुळे अनेकदा प्रवासी स्टेशनवरच राहतात, अशा अनेक घटना घडल्या आहेत.

१ मिनिटाचा उशीर, प्रवाशाच्या समोरच वंदे भारत ट्रेन सुटली; लोको पायलटला विनंती केली, पण...
Vande Bharat Train News: देशातील वंदे भारत ट्रेन ही एक प्रिमियम, हायस्पीड आणि सर्वांत लोकप्रिय ट्रेन आहे. देशभरात सुमारे १६० वंदे भारत ट्रेन सेवेत असून, अगदी काही सेवा सोडल्यास प्रवाशांचा वंदे भारत ट्रेनचा प्रचंड प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ८ कोचच्या असलेल्या अनेक वंदे भारत ट्रेन आता १६ आणि २० कोचच्या झाल्या आहेत. यावरून प्रवाशांची वंदे भारत ट्रेनला असलेली पसंती अधोरेखित होते. यातच प्रवाशांच्या वंदे भारत ट्रेन चुकण्याच्या किंवा समोरून निघून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकदा लोको पायलट किंवा ट्रेन मॅनेजर प्रवाशांसाठी ट्रेन थांबवत असल्याचेही पाहायला मिळाले. परंतु, एका प्रवाशाला मात्र असा अनुभव आला नाही.
वंदे भारत एक्स्प्रेस नेहमीच वेळेवर असते. एखादा प्रवासी उशिरा पोहोचला तर त्याची ट्रेन चुकण्याची शक्यता जास्त असते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रासी उशिरा पोहोचल्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेसचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. तो लोको पायलटच्या कोचमध्ये जाऊन त्याची विनंतीही करतो. पण ड्युटीवर असलेले रेल्वे कर्मचारी त्याला मदत करण्यास नकार देतात. ही घटना स्टेशनवर असलेल्या अन्य एका व्यक्तीने कॅमेऱ्यात टिपली अन् सोशल मीडियावर शेअर केली.
रेल्वे स्टेशनच्या पायऱ्यांवरून व्हिडिओ काढणाऱ्या एका व्यक्तीने वंदे भारत एक्सप्रेस पकडण्यासाठी आलेल्या एका प्रवाशाचा व्हिडिओ काढला. दार बंद आहे, तरीही हे लोक मागून वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वंदे भारत एक्सप्रेस आधीच निघून गेली आहे. त्यांची ट्रेन चुकली. ते गार्डला विनंती करत आहेत की कृपया चढू द्या. पण चढू दिले नाही आणि त्यांची वंदे भारत एक्सप्रेस चुकली, असे व्हिडिओ काढणारी व्यक्ती सांगत आहे.
दरम्यान, वंदे भारत ट्रेनच्या तिकिटाची किंमत प्रवास केलेल्या अंतरावरून ठरवली जाते. या प्रकरणात, ट्रेन तिकिटाची किंमत ४ हजार रुपये होती, असा दावा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. या व्हिडिओला २००,००० हून अधिक व्ह्यूज, २५०० हून अधिक लाइक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्याचे म्हटले जात आहे. सावधगिरी बाळगा. एक मिनिट उशिरा आल्यास तुम्हाला ४ हजारांचा भुर्दंड सोसावा लागेल. वंदे भारत एक्सप्रेस डोळ्यासमोरून रवाना झाली. प्रवाशांनी गार्डला दरवाजा उघडण्याची विनंती केली, परंतु स्वयंचलित दरवाजे आणि कडक नियम यामुळे प्रवाशाने केलेली विनंती निष्फळ ठरली आणि ट्रेन रवाना झाली, असे व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.