सुट्टीच्या दिवशी भारतीय कर्मचाऱ्याने पाठवला Email; जर्मन बॉस चांगलाच संतापला, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:56 IST2026-03-11T12:55:31+5:302026-03-11T12:56:10+5:30
भारतात त्या आयटी कर्मचाऱ्याकडून कंपनी प्रचंड काम करून घेत होती. मात्र जेव्हा तो त्याच कंपनीसाठी जर्मनीत काम करायला गेला तेव्हा तिथले वर्क कल्चर खूप वेगळे होते

सुट्टीच्या दिवशी भारतीय कर्मचाऱ्याने पाठवला Email; जर्मन बॉस चांगलाच संतापला, काय घडलं?
जागतिक स्पर्धेत भारत आजही जगातील अनेक देशांच्या तुलनेत पुढे आहे. परंतु कॉर्पोरेट वर्क कल्चर कसं असायला हवे यात भारताला आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. इंटरनेटवर सध्या आदित्य कोंडावर नावाच्या यूजरने त्याच्या जर्मन बॉसविषयी पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये आदित्यने जे सांगितलंय ते सध्या व्हायरल झाले आहे. लोक त्यावर चर्चा करताहेत. आदित्यच्या पोस्टवर भारत आणि जर्मनी यांच्यातील वर्क कल्चरमधील अंतर स्पष्टपणे दिसत आहे.
आदित्यने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलेय की, अलीकडेच माझी भेट एका आयटी कंपनीत काम करणाऱ्याशी झाली. जो याआधी भारतात काम करत होता. त्या कंपनीतील भारतीय मॅनेजर त्याला २४ तास आणि इतकेच नाही तर सुट्टीच्या दिवशीही काम करण्यासाठी प्रेरित करत होते. भारतात कुठलाही कर्मचारी असं काम करत असेल तर त्याला खूप चांगला कर्मचारी आणि मेहनती कर्मचारी समजले जाते. परंतु हीच गोष्ट परदेशातील अनेक देशांत अजिबात चालत नाही.
जर्मनीतही त्याने तेच केले
भारतात त्या आयटी कर्मचाऱ्याकडून कंपनी प्रचंड काम करून घेत होती. मात्र जेव्हा तो त्याच कंपनीसाठी जर्मनीत काम करायला गेला तेव्हा तिथले वर्क कल्चर खूप वेगळे होते. एकेदिवशी जर्मनीत काम करताना त्याने सुट्टीच्या दिवशी Email ला उत्तर पाठवले तेव्हा त्याचा मॅनेजर प्रचंड संतापला. सुट्टीच्या दिवशीही या कर्मचाऱ्याने काम केले त्याचे कौतुक त्याला नव्हते. त्या बॉसने वीकेंडला काम केल्यामुळे कर्मचाऱ्याला चांगलेच फटकारले. एकाच कंपनीत वेगवेगळ्या देशात काम करण्याचं वातावरण वेगळे होते. आदित्य कोंडावरच्या या पोस्टवर अनेक भारतीयांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आतापर्यंत या पोस्टला २ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळालेत. लोक त्यांची मते कमेंटमधून मांडत आहेत. काहींनी वर्क कल्चरवरून समर्थन केले आहे तर काहींनी यावर असहमती दर्शवली. एका युजरने त्याचा अनुभव शेअर केला. मी अनेक युरोपिय लोकांसोबत काम केले आहे. वीकेंडला काम करतो. ईमेल पाठवतो. कधी कधी अमेरिकन भारतीयांपेक्षाही जास्त काम करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे वीकेंडला ईमेल पाठवल्याने ओरडणे योग्य नाही असं त्याने सांगितले. भारतात अनेक कंपन्यांमध्ये १० ते १२ तास शिफ्ट असते. त्यातून वर्क बॅलेन्स होत नाही. वीकेंडलाही टेन्शन देणारे काम दिले जाते. टार्गेट आणि डेडलाईनमुळे कामाचा दबाव वाढतो. त्यामुळे भारतातील कंपन्यांमधील वर्क कल्चर टॉक्सिक मानले जाते.
