५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:27 IST2025-09-18T13:26:43+5:302025-09-18T13:27:18+5:30
Flat or Farm Land: आजकाल गावाकडची जमीन विकून लोक शहरात सेटल होऊ लागले आहेत. गावागावात शेती ओस पडू लागली आहे किंवा कोणालातरी कसायला दिली आहे.

५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
आजकाल गावाकडची जमीन विकून लोक शहरात सेटल होऊ लागले आहेत. गावागावात शेती ओस पडू लागली आहे किंवा कोणालातरी कसायला दिली आहे. शेतकऱ्यांची मुले शेती परवडत नाहीत म्हणून शहरांत नोकरी करू लागली आहेत. या परिस्थितीत सोशल मीडियावर शहरात ५० लाखांचा फ्लॅट घ्यावा की गावी ३ एकर जमीन असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
एका युजरने उंच इमारतीवच्या फोटोवर ५० लाखांचा फ्लॅट घेणे चांगले की गावाकडे त्याच पैशांतून जागा घेणे चांगले असा प्रश्न विचारला आहे. लोकांनी त्यांच्या त्यांच्या परीने उत्तरे देण्यास सुरुवात केली. कोणी गावाकडच्या जमिनीचे फायदे सांगितले तर कोणी शहरातल्या फ्लॅटचे. तसेच काहींनी आपले अनुभवही सांगितले. अर्थात या गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीत लागू होतीलच असे नाही. परंतू, यावरून एकंदरीत परिस्थितीची कल्पना येऊ शकते.
एकाने लिहिले की गावी याच पैशांतून जास्त जमीन येईल, ती विकसित केली तर त्यातून करोडो रुपये होतील असे सांगितले. तर दुसऱ्याने फ्लॅटची किंमत दरवर्षी वाढतच जाईल शिवाय भाड्यातून शेतीपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल, असेही सांगितले. काहींनी गावी शेतजमीन असेल तर ती विकून शहरात फ्लॅट घे, त्यातून महिन्याला जास्त उत्पन्न येईलच तसेच जेव्हा विकायचा असेल तेव्हा वाढलेल्या किंमतीत विकून पुन्हा त्या पैशांत गावी जमीन देखील घेऊ शकतो, असे पर्याय सुचविले.
एका युजरने तेच ५० लाख ना जमीन, ना घर घेता त्याची एफडी करायला सांगितली. तसेच फ्लॅट भाड्याने घेऊन एफडीतून येणाऱ्या व्याजावर भाडे सुटेल आणि वर मौजही करता येईल असेही सांगितले. आता या गोष्टी त्या त्या शहरावर, गावावर अवलंबून आहेत. अनेकदा फ्लॅट घेतला आणि त्या प्रमाणात त्याची किंमतच वाढली नाही असेही झालेले आहे. अनेकदा ५० लाखांचा फ्लॅट बघता बघता दीड-दोन कोटींच्या घरातही गेलेला आहे.