मूळव्याधाच्या शस्त्रक्रियेनंतरही रजा मिळेना; लोको पायलटने वरिष्ठांसमोर पँट काढून दाखवले टाके
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 13:54 IST2026-03-05T13:51:18+5:302026-03-05T13:54:47+5:30
Railway Loco Pilot Viral Video: रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला रजा मंजूर करून घेण्यासाठी अत्यंत लज्जास्पद पाऊल उचलावे लागले.

मूळव्याधाच्या शस्त्रक्रियेनंतरही रजा मिळेना; लोको पायलटने वरिष्ठांसमोर पँट काढून दाखवले टाके
रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला रजा मंजूर करून घेण्यासाठी अत्यंत लज्जास्पद पाऊल उचलावे लागले. मूळव्याध शस्त्रक्रिया झालेल्या लोको पायलटने रजेसाठी वरिष्ठांकडे अर्ज केला. परंतु, वरिष्ठांनी शस्त्रक्रियेबद्दल संशय व्यक्त करत रजा मंजूर करण्यास नकार दिला आणि पुरावा मागितला. मात्र, त्यानंतर संतापलेल्या कर्मचाऱ्याने थेट रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर पँट काढली आणि शस्त्रक्रियेचे टाके दाखवले. ही घटना उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लोको पायलटवर काही दिवसांपूर्वीच मूळव्याधाची शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. प्रकृती ठिक नसल्याने लोको पायलटने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वैद्यकीय रजेची मागणी केली. मात्र, वारंवार विनंती करूनही वरिष्ठांनी शस्त्रक्रियेबद्दल संशय व्यक्त केला आणि रजा मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिला. आजारी असतानाही कामावर हजर राहण्याचा दबाव आणि रजेसाठी विचारला जाणारा पुरावा यामुळे लोको पायलटचा संयम सुटला. आपण खोटे बोलत नसल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याने थेट वरिष्ठांच्या कार्यालयात आपली पँट काढली आणि शस्त्रक्रिया केलेले टाके दाखवले. या अनपेक्षित प्रकारामुळे कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी स्तब्ध झाले.
🚨 Loco Pilot #Rajesh_Meena Forced To undress For Medical Leave Is This Governance Or Humiliation❓
— Nitin Tyagi (@iNitinTyagi) March 4, 2026
In the Northern Railway’s Lucknow Rail Division, loco pilot Rajesh Meena who had recently undergone surgery was allegedly denied medical leave despite submitting medical reports… pic.twitter.com/JgpQqFQKRT
ही घटना कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. रेल्वे पायलटला तासनतास एका जागेवर बसून इंजिन चालवावे लागते, जे मूळव्याध झालेल्या रुग्णासाठी अत्यंत वेदनादायी असते. कर्मचाऱ्याने वारंवार विनंती करूनही त्याला पुरावा मागणे, ही वरिष्ठांची असंवेदनशीलता असल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे.