शाही पनीर, दाल मक्खनी, रायता आणि ९ चपात्या अन् बिल अवघं २६.३० रुपये! लोक म्हणताहेत लाजवाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 16:22 IST2022-11-18T16:19:54+5:302022-11-18T16:22:06+5:30
सोशल मीडियात सध्या ३७ वर्षांपूर्वीचं एक बिल खूप व्हायरल होत आहे. बिल एका रेस्टॉरंटमधील जेवणाचं आहे. नेटिझन्स या बिलाची तुलना आजच्या बिलाशी करत आहेत.

शाही पनीर, दाल मक्खनी, रायता आणि ९ चपात्या अन् बिल अवघं २६.३० रुपये! लोक म्हणताहेत लाजवाब
नवी दिल्ली-
सोशल मीडियात सध्या ३७ वर्षांपूर्वीचं एक बिल खूप व्हायरल होत आहे. बिल एका रेस्टॉरंटमधील जेवणाचं आहे. नेटिझन्स या बिलाची तुलना आजच्या बिलाशी करत आहेत. एक बिल १९८५ सालचं आहे. तर दुसरं २०२२ म्हणजे याच वर्षातलं आहे. बरं दोन्ही बिलांमध्ये ऑर्डर करण्यात आलेले खाद्यपदार्थ समान आहेत. पण बिलाच्या किमतीत प्रचंड तफावत आहे.
१९८५ मध्ये अवघ्या ८ रुपये किमतीच्या शाही पनीरची किंमत आज ३२९ रुपये इतकी आहे. म्हणजे आता या डिशची किंमत ४० पटीनं वाढली आहेत. तर ५ रुपयांच्या दाल मखनीची किंमत आज ३९९ रुपये आहे म्हणजेच ३५ वर्षात किंमत ८० पट वाढली आहे. त्याकाळात ५ रुपयांना मिळणार्या रायतासाठी आता १३९ रुपये खर्च करावे लागत आहेत. एकूण बिल पाहिलं तर १९८५ सालचं बिल अवघं २६ रुपयांच्या घरात होतं. पण आता याच थाळीसाठी १२०० रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागत आहे.
आमच्या काळात खाद्यपदार्थ खूप स्वस्त होते, असं तुम्हीही तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींकडून अनेकदा ऐकलं असेल. पूर्वी अगदी ५ रुपयांत पिशवी भरून भाज्या यायच्या, पण आता या गोष्टींवर विश्वास ठेवणं जरा कठीणच आहे. कारण आज जर तुम्ही बाजारात भाजी घेण्यासाठी गेलात तर ५०० रुपये अगदी सहज खर्च होतात.
१९८५ मध्ये एका रेस्टॉरंटमध्ये फक्त २६ रुपयांत जेवण
सोशल मीडियात व्हायरल झालेलं हे बिल १९८५ मधील एका रेस्टॉरंटचं आहे. बिलात शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि रोटी ऑर्डर केली गेली आहे. या खाद्यपदार्थांचे दर पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यावेळी शाही पनीर फक्त ८ रुपयात मिळायचे. तर दाल मखनी आणि रायता केवळ ५ रुपयांना मिळत होते. याशिवाय रोटीची किंमत एक रुपयापेक्षा कमी होती. एका रोटीची किंमत ७० पैसे होती. एकंदरीत हे संपूर्ण बिल २६ रुपये ३० पैसे इतकं आहे. त्यासोबत २ रुपये सेवा शुल्कही जोडण्यात आलं आहे. हे एका रेस्टॉरंटचे बिल आहे. आता याच डिश आता हॉटेलमधून मागवण्यात आल्या तर त्याचं काय बिल येईल याची कल्पना करा.
आता किंमती ४८ पटींनी वाढल्या
१९८५ सालचं हे बिल पाहिलं तर विश्वास बसणे कठीण आहे. पुन्हा तेच खाद्यपदार्थ मागवले गेले तर आजच्या तारखेला याच गोष्टी १२६० रुपयांना मिळतील. शाही पनीर ३२९ रुपयांना, दाल मखनी ३९९ रुपयांना, रायता १३९ रुपयांना आणि रोटी २४ रुपयांना मिळत असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय भरपूर कर भरावा लागला. ही दोन बिलं पाहिल्यास १९८५ पासून आतापर्यंत या खाद्यपदार्थांमध्ये सुमारे ४८ पट वाढ झाली आहे.