Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:54 IST2025-10-14T13:54:08+5:302025-10-14T13:54:40+5:30
बंगळुरुमध्ये ११ वर्षांपासून राहणाऱ्या रशियन महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय!

Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
Russian Woman In Bengaluru: भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे बंगळुरू देशातील सर्वात महाग शहरांपैकी एक आहे. येथे राहण्यासाठी आणि एक चांगले आयुष्य जगण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागतो. सध्या बंगळुरुमध्ये राहणाऱ्या एका रशियन महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तिने बंगळुरुमध्ये राहण्यासाठी तिला महिन्याचा तब्बल ₹3 लाखांचा खर्च येतो, अशी माहिती दिली. तिच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹45,000
रशियन महिला यूलिया असलमोवा (Iuliia Aslamova) गेल्या ११ वर्षांपासून बंगळुरुमध्ये काम करते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर आपला महिन्याचा खर्च जाहीर केला. या व्हिडिओने इंटरनेटवर अक्षरशः खळबळ उडवली आहे. तिने सांगितले की, तिच्या तीन जणांच्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च तब्बल ₹३ लाख आहे.
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
आपल्या व्हिडिओत तिने कुठल्या गोष्टीसाठी किती खर्च लागतो, याची माहिती दिली. तिच्या माहितीनुसार तिला घरभाडे- ₹१.२५ लाख, अन्न व घरगुती वस्तू- ₹७५,०००, मुलांच्या शाळेची फी- ₹३०,०००, आरोग्य आणि फिटनेस- ₹३०,०००, पेट्रोल- ₹५,००० एवढा खर्च लागतो. मात्र, लोकांचे लक्ष वेधून घेतले ते तिच्या घरकाम करणाऱ्या बाईच्या पगाराने! यूलियाने आपल्या व्हिडिओत सांगितले की, ती आपल्या कामवाली बाईला दरमहा ₹४५,००० पगार देते. हे ऐकून नेटिझन्सना अक्षरशः धक्का बसला.
व्हिडिओला आत्तापर्यंत ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, कमेंट्सचा अक्षरशः पूर आला आहे. एका युजरने विचारले, “आपण ताज हॉटेलमध्ये राहता का?” दुसऱ्याने लिहिले, “सवा लाख रेंट? मॅडम, हा टायपो नाही ना?” तर, एका व्यक्तीने टोमणा मारला, “ही बाई माझा वर्षभराचा पगार एका महिन्यात खर्च करते.” तर आणखी एका कमेंटमध्ये म्हटले, “घरकाम करणाऱ्या बाईला ₹४५,०००? इतका पगार तर अनेक ग्रॅज्युएट लोकांना मिळत नाही!”
पूर्वी बंगळुरू स्वस्त होतं, आता नाही- यूलिया
यूलियाने या व्हिडिओसोबत बंगळुरुमध्ये राहण्याचा आपला अनुभव शेअर केला. तिने सांगितले की, जेव्हा ती ११ वर्षांपूर्वी बंगळुरुत आली होती, तेव्हा खर्च खूप कमी होता. त्या काळात 2BHK फ्लॅटचे भाडे फक्त ₹२५,००० होते. मात्र आज, तिन्ही सदस्यांच्या कुटुंबाला आरामदायी राहणीसाठी किमान ₹२.५ लाखांची गरज लागते. अनेक सोशल मीडिया युजर्सचे मत आहे की, यूलियाची जीवनशैली अत्यंत उच्च दर्जाची असल्याने तिचे खर्च जास्त आहेत.