सगळं काही बेचिराख झाल्यानंतरचे ऑस्ट्रेलियातील 'हे' फोटो पाहून कळतं, यालाच जीवन ऐसे नाव...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 13:30 IST2020-01-09T13:25:23+5:302020-01-09T13:30:37+5:30
ऑस्ट्रेलियातील जंगलातून एक आशादायी चित्र समोर आलं असून ते पाहून लोकांमध्ये आनंद आहे.

सगळं काही बेचिराख झाल्यानंतरचे ऑस्ट्रेलियातील 'हे' फोटो पाहून कळतं, यालाच जीवन ऐसे नाव...
ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भयंकर आगीमुळे २००० पेक्षा घरे जळून राख झाली, कोट्यवधी प्राणी-पक्षी आणि २४ पेक्षा अधिक लोकांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीने अख्ख्या जगाला हादरवून सोडलंय. इतकेच काय तर दुसऱ्या देशांमधूनही काही फायर फायटर्स इथे आग विझवण्यासाठी पोहोचले आहेत.
अशात या जंगलातील काही दिलासादायक फोटो समोर आले आहेत. जमीन काळी पडलीये, झाडे कोळसा झाली आहेत. पण अशातच जंगलात नवीन जीवन फूलत आहे. काही नविन झाडे आशेचा किरण घेऊन वर येत आहेत.
Murray Lowe नावाच्या एका फोटोग्राफरने ही फोटो क्लिक केली आहेत. त्यांनी लिहिले की, 'इथे पाऊस आला नसला तरी सुद्धा नविन जीवन वाढत आहे'. हे फोटो शेअर केल्यावर ४० हजारपेक्षा जास्त लोकांनी शेअर केले आहेत.
आगीने राख झाल्यानंतर जंगलाचे हे फोटो पाहून लोकांमध्ये एक नवी आशा निर्माण झाली आहे. लोकांना हे समजून येतंय की, निसर्गच आपली आई आहे. तिच आपली काळजी घेते.
असं म्हणतात की, निसर्गात प्रत्येक जीव आपलं काम करत आहे. फक्त मनुष्यच असा प्राणी आहे जो नियमांना मूठमाती देतोय. मनुष्य आपल्या मर्जीने काहीही करतो. नंतर निसर्गाचा रोषही मनुष्यांनाच सहन करावा लागतो.