मुंबईला मागे टाकले! बंगळुरूत बाथरुमच्या आकाराच्या 1BR फ्लॅटचे भाडे २५००० रुपये; नेटकरी बेशुद्ध पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:16 IST2025-02-11T13:16:02+5:302025-02-11T13:16:15+5:30
शहरांत सध्या घर घेणे आणि भाड्याने राहणे म्हणजे जिवावर उदार होऊन राहण्यासारखे झाले आहे. पगाराचा मोठा भाग ही भाडी देण्यात जात आहे.

मुंबईला मागे टाकले! बंगळुरूत बाथरुमच्या आकाराच्या 1BR फ्लॅटचे भाडे २५००० रुपये; नेटकरी बेशुद्ध पडले
शहरांत सध्या घर घेणे आणि भाड्याने राहणे म्हणजे जिवावर उदार होऊन राहण्यासारखे झाले आहे. पगाराचा मोठा भाग ही भाडी देण्यात जात आहे. अशा घरांची साईज पाहिली तर तुम्ही चक्कर येऊन पडाल किंवा राहुदे गड्या, आपला गाव बरा म्हणाल. बंगळुरुच्या एका टेकीने त्याच्या मित्राचा म्हणून सांगून एक फ्लॅट दाखविला आहे. ज्याचे भाडे २५००० रुपये महिना आहे.
हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागे कारण म्हणजे त्याचा आकार आहे. आपल्याकडे बाथरुमचा जेवढा आकार असेल तेवढाच त्याचा आकार आहे. आयताकृती असलेल्या या फ्लॅटमध्ये दोन हात पसरविले की दोन बाजुच्या भिंतीना टेकतात आणि लांबी मोजण्यासाठी एक हात आणि एक पाय असा दोन्ही बाजुला पसरविला की भिंतींना टेकतात, अशी या फ्लॅटची अवस्था आहे.
याहून गंमत म्हणजे या फ्लॅटची गॅलरी आहे. तिथे तुम्ही फक्त उभेच राहू शकता. मुळात 1BR संकल्पना समजून घ्या. १ बीआर म्हणजे १ बाल्कनी आणि १ रूम. म्हणजे इथे १ बीएचके, १ आरकेलाही तिलांजली देण्यात आली आहे. एवढ्या छोट्या घराचे भाडे २५००० रुपये आहे. म्हणजे यात या लोकांनी मुंबईलाही मागे टाकले आहे.
आता हा जो व्यक्ती आहे ज्याने त्याच्या मित्राचा फ्लॅट सांगून तो दाखविला आहे, त्याने या फ्लॅटचे फायदे सांगितले आहेत. तुम्हाला गर्लफ्रेंड असू शकत नाही, तिच्यावरचा खर्च वाचणार आहे. कारण जर ती आली तर एकतर ती नाहीतर तुम्ही तिथे राहू शकता, असे त्याने सांगितले आहे. दुसरी बाब म्हणजे, ना टेबल ना खूर्ची घ्यावी लागणार आहे. कारण ती ठेवली तर तुम्ही कसे राहणार असा सवाल त्याने केला आहे.