Tiger Attack: वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:22 IST2025-12-30T15:21:46+5:302025-12-30T15:22:57+5:30
MP Tiger Attack News: ही चकीत करणारी घटना मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्प परिसरातील एका गावात घडली आहे.

Tiger Attack: वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
Madhya Pradesh Tiger News:मध्य प्रदेशातील प्रसिद्ध बांधवगड व्याघ्र प्रकल्प परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. व्याघ्र प्रकल्पालगतच्या एका गावात वाघ शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाघाने आधी एका तरुणावर हल्ला केला आणि त्यानंतर थेट एका घरात घुसून पलंगावर झोपी गेला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तरुणावर हल्ला; पायाला गंभीर दुखापत
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, वाघाने गोपाल कोल नावाच्या तरुणावर अचानक हल्ला केला. वाघाने एका पंज्यानेच गोपालला जमिनीवर पाडले. या हल्ल्यात गोपालच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी तरुणाला तत्काळ कटनी जिल्ह्यातील बरही रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात आले आहे.
बांधवगढ़ टाइगर रिजर्व के पास बेलदी गाँव में एक व्यक्ति को घायल कर बिस्तर पर जाकर बैठ गया टाइगर pic.twitter.com/JNtuuTLVr9
— Nitendra Sharma (@nitendrasharma2) December 29, 2025
हल्ल्यानंतर थेट घरात शिरला वाघ
गोपालवर हल्ला केल्यानंतर वाघ थेट दुर्गा प्रसाद द्विवेदी यांच्या घरात शिरला. घरातील खोलीत असलेल्या पलंगावर आरामात झोपी गेल्याने ग्रामस्थ थक्क झाले. वाघ घरात शिरल्याची बातमी पसरताच गावातील अनेक नागरिक जीव वाचवण्यासाठी घरांच्या छतांवर जाऊन थांबले. घटनेची माहिती मिळताच बांधवगड व्याघ्र प्रकल्पाकडून बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 8 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाघाला बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या पकडण्यात आले.
भीतीचे वातावरण कायम
या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाकडून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.