आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) तुम्हाला अनेक गोष्टींवर क्षणार्धात उपाय देतं, म्हणून लोक आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी देखील त्याच्याकडे जातात. मात्र हे अजिबात योग्य नाही. कोणत्याही प्रकारच्या आरोग्याशी संबंधित समस्येसाठी ChatGPT (AI) वर अवलंबून राहणं जीवावर बेतू शकतं. जर तुम्ही ChatGPT चा सल्ला घेऊन औषधं घेत असाल तर वेळीच सावध व्हा. ChatGPT च्या सल्ल्याने एका ६० वर्षीय व्यक्तीला त्रास झाला आणि तो थेट रुग्णालयातच दाखल झाला.
एका ६० वर्षीय व्यक्तीने ChatGPT ला त्याच्या डाएटमधून टेबल सॉल्ट/मीठ (सोडियम क्लोराईड) कसं काढून टाकायचं हे विचारल्यानंतर रुग्णालयात जावं लागलं. त्यांनी मिठामुळे आरोग्यावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबद्दल वाचलं होतं आणि त्याला मिठाऐवजी दुसरं काहीतरी खायचं होतं. मिठाऐवजी त्यांनी सोडियम ब्रोमाइड वापरण्यास सुरुवात केली. सोडियम ब्रोमाइड हे एक केमिकल आहे जे १९०० च्या दशकाच्या सुरुवातीला औषधांमध्ये वापरलं जात होतं, परंतु आता ते मोठ्या प्रमाणात विषारी मानलं जातं.
तब्येत कशी बिघडली?
ChatGPT वर ६० वर्षीय व्यक्तीने वाचलं की क्लोराईडऐवजी ब्रोमाइड वापरता येतं, म्हणून त्याने तीन महिने क्लोराईडऐवजी ब्रोमाइड खाल्लं. त्याने इंटरनेटवरून सोडियम ब्रोमाइड विकत घेतलं आणि ते त्यांच्या जेवणात वापरलं.
कालांतराने तब्येत बिघडली. खूप तहान लागली, त्वचेच्या समस्या होत्या आणि पॅरानोईया यासारख्या गंभीर मानसिक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला. जेव्हा त्यांना पहिल्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा त्यांनी कोणतीही औषधं घेतल्याचं सांगितलं नाही. नंतर त्यांनी सांगितलं की, ते त्यांच्या जेवणात मीठ टाळत आहेत, घरी पाणी उकळून पीत आहेत आणि मीठाच्या जागी सोडियम ब्रोमाइडचा वापर करत आहेत.
डॉक्टरांना आढळलं की, ते ब्रोमिझमने ग्रस्त आहेत, म्हणजेच त्याच्या शरीरात ब्रोमाइडचं प्रमाण खूप वाढलं आहे, जे विषासारखं काम करतं. त्याचं आरोग्य सुधारण्यासाठी, त्यांना लिक्विड्स आणि इलेक्ट्रोलाइट्स देण्यात आलं. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य विभागात दाखल करण्यात आलं.