असेही ग्राहक असतात! ३८,००० रुपयांचे बिल बुडवण्यासाठी ग्राहकाने केला घाणेरडा प्रकार; CCTV मुळे सत्य समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 19:32 IST2026-02-17T19:30:58+5:302026-02-17T19:32:50+5:30
हॉटेलमधील जेवणाचे पैसे चुकवण्यासाठी ग्राहकाने केलेला कांगावा कॅमेऱ्यात कैद

असेही ग्राहक असतात! ३८,००० रुपयांचे बिल बुडवण्यासाठी ग्राहकाने केला घाणेरडा प्रकार; CCTV मुळे सत्य समोर
हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिल भरताना टाळाटाळ करण्यासाठी लोक अनेकदा विचित्र कारणे शोधतात. मात्र, ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये एका ग्राहकाने बिल बुडवण्यासाठी जे कृत्य केले, ते पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आलिशान हॉटेलमध्ये भरपेट जेवण केल्यानंतर अन्नात केस निघाल्याची तक्रार या ग्राहकाने केली, मात्र हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजने याची पोलखोल केली आहे.
सिडनीमधील प्रसिद्ध पोनी डायनिंग या रेस्टॉरंटमध्ये सहा जणांचा एक गट जेवण्यासाठी आला होता. त्यांनी अतिशय महागड्या डिशेस, स्टेक्स आणि ड्रिंक्सची ऑर्डर दिली होती. या सर्वांचे एकूण बिल ६०० ऑस्ट्रेलियन डॉलर्स (भारतीय चलनानुसार ३८ ते ४० हजार रुपये) झाले होते. जेवण संपत आल्यावर या गटातील एका व्यक्तीने अन्नात केस सापडल्याचा कांगावा केला. अन्नात केस निघाल्यामुळे आम्ही बिल भरणार नाही, असा पवित्रा या संपूर्ण ग्रुपने घेतला आणि बिल न भरताच तेथून निघून गेले.
CCTV फुटेजमध्ये कारस्थान कैद
ग्राहकांच्या संशयास्पद वागणुकीमुळे हॉटेल व्यवस्थापकाने सीसीटीव्ही तपासण्याचे ठरवले. कॅमेरा फुटेज पाहिल्यानंतर हॉटेल कर्मचारी थक्क झाले. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, तो ग्राहक अत्यंत सावधपणे आपला हात काखेत नेतो, तेथील केस उपटतो आणि शांतपणे आपल्या ताटातील अन्नात टाकतो. त्यानंतर तो केस सापडल्याचे नाटक करून हॉटेल कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागतो.
हॉटेलने मांडली व्यथा
पोनी डायनिंगने हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करत इतर हॉटेल व्यावसायिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. हॉटेलने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "आम्ही सहसा असे व्हिडिओ शेअर करत नाही. पण या ग्राहकाने केस निघाल्याची तक्रार करून बिल भरण्यास नकार दिला. हा व्हिडिओ शेअर करण्यामागचा उद्देश फक्त इतर व्यावसायिकांना अशा लोकांपासून सावध करणे हा आहे. आम्ही या प्रकरणाची अधिकृत तक्रार नोंदवली आहे." हॉटेल व्यवस्थापकाने सांगितले की, त्यांनी या ग्राहकांना उत्तम सेवा दिली होती, मात्र त्यांचे वागणे विचित्र वाटल्यामुळे सीसीटीव्ही तपासला आणि हे धक्कादायक वास्तव समोर आले.
सोशल मीडियावर संतापाची लाट
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या ग्राहकावर कडक टीका केली आहे. हा केवळ फसवणुकीचा प्रकार नसून चोरी आहे, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर काहींनी याला विकृती म्हटले आहे. एका हॉटेलमध्ये जाऊन इतक्या महागड्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आणि नंतर अशा घृणास्पद पद्धतीने बिल बुडवायचे, याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.