विद्रूप चेहऱ्यामुळे कुणी प्रेम करणार नाही असं वाटायचं, तेव्हाच जीवनात आली सुंदर तरूणी आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 14:35 IST2024-12-19T14:33:21+5:302024-12-19T14:35:08+5:30
विद्रूप चेहऱ्यासोबत जन्माला आलेल्या अमितला नेहमीच चिंता राहत होती की, कधी कुणी त्याच्यावर प्रेम करेल की नाही. त्याला नेहमीच असं वाटत होतं की, असा चेहरा असलेल्या व्यक्तीवर कुणीच प्रेम करणार नाही.

विद्रूप चेहऱ्यामुळे कुणी प्रेम करणार नाही असं वाटायचं, तेव्हाच जीवनात आली सुंदर तरूणी आणि...
जगभरात रोज अशी अनेक मुले जन्म घेतात, जी जन्मताच एखाद्या आजाराने ग्रस्त असतात. कुणाचा चेहरा विद्रूप असतो तर कुणाला शेपूट असतं. कधी कधी हाताला १० पेक्षा जास्त बोटं असतात. अशा मुलांचं जीवन फारच अडचणींचं असतं. त्यांचं मानसिक दृष्या खूप खच्चीकरण केलं जातं. पण तरीही काही मुले आत्मविश्वासाने सगळं काही स्वीकारून पुढे जातात. अशीच एक व्यक्ती इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये राहते. ती म्हणजे ३४ वर्षीय अमित घोष. विद्रूप चेहऱ्यासोबत जन्माला आलेल्या अमितला नेहमीच चिंता राहत होती की, कधी कुणी त्याच्यावर प्रेम करेल की नाही. त्याला नेहमीच असं वाटत होतं की, असा चेहरा असलेल्या व्यक्तीवर कुणीच प्रेम करणार नाही. मात्र, त्याच्या आयुष्यात एका सुंदर तरूणीची एन्ट्री झाली आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. याच अमितची लव्हस्टोरी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
ही अमित घोष आणि पियालीची लव्हस्टोरी आहे. अमितने सांगितलं की, '२०२१ च्या आधीपर्यंत मला असं वाटत होतं की, मला एकट्यानेच जीवन जगायचं आहे. मात्र, त्याचवर्षी माझ्या एका मित्राने माझी आणि पियाली भेट घडवून आणली. पहिल्याच भेटीत पियालीने मला नाकारलं. पण मित्राच्या सांगण्यावरून मी तिला मेसेज करत राहिलो. हळूहळू आमच्यात आवडी-निवडी, भविष्याबाबत बोलणं झालं. काही दिवसातच आम्ही व्हिडीओ कॉल करून बोलू लागलो. आम्ही वेगवेगळ्या देशात होतो, पण आम्हाला आमच्यात एक वेगळंच कनेक्शन असण्याची जाणीव झाली होती.
अमितने सांगितलं की, 'मला नेहमीच या गोष्टीची चिंता होती की, लोक माझ्या कौशल्यापेक्षा, एक व्यक्ती म्हणून माझ्याकडे बघण्यापेक्षा मला चेहऱ्यावरून जज करतील. पण मी पियालीशी बोललो आणि आम्ही जवळ आलो'. त्याने पुढे सांगितलं की, 'व्हिडीओ कॉलवर बोलणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. अनेक वर्ष विद्रूप चेहऱ्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पियालीसोबत बोलत असताना मी माझ्या चेहऱ्याचा एक भाग झाकून ठेवत होतो. हळूहळू भीती कमी झाली. काही दिवसांनी पियाली म्हणाली की, 'माझ्या आई-वडिलांकडे मला मागणी घाल'. माझ्या आनंदाला सीमा नव्हती. पण माझ्या विद्रूप चेहऱ्यामुळे त्यांनी मला नकार दिला. अशात आमचं बोलणं बंद झालं. चार दिवसांनी पियालीचा फोन आला आणि म्हणाली की, 'मी आई-वडिलांना तयार केलं आहे'. ती मला म्हणाली की, मी तुझ्या अर्ध्या चेहऱ्यासोबत थोडीच लग्न करत आहे. तिचं असं बोलणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं'.
बर्मिंघममध्ये पती अमितसोबत राहणारी मेकअप आर्टिस्ट पियाली म्हणाली की, 'जेव्हा तो त्याचा चेहरा लपवत होता तेव्हा मला खूप राग यायचा. मी त्याला कधी एका चेहऱ्याच्या रूपात पाहिलं नाही. तर एक संपूर्ण व्यक्तीच्या रूपात पाहिलं'.
सगळं काही सुरळीत झाल्याने डिसेंबर २०२१ मध्ये अमित आणि पियालीने लग्न केलं. अमित म्हणाला की, हा आमच्या जीवनातील सगळ्यात चांगला दिवस होता. आम्ही इंग्लंडमध्ये स्वत:चं एक विश्व तयार केलं आहे. आम्ही लवकरच आई-वडील होणार आहोत. दरम्यान इंग्लंडमध्ये राहणारा अमित बर्मिंघमच्या एका लॉ फर्ममध्ये काम करतो. जन्मताच त्याला न्यूरोफाइब्रोमॅटोसिस टाइप 1 नावाचा रोग झाला होता. हा एक असा आजार आहे ज्यात तंत्रिकांसोबत ट्यूमर विकसित होतो. अमित जेव्हा ११ वर्षांचा होता तेव्हा त्याने त्याचा डावा डोळा गमावला होता. दुसरा डोळा बसवेपर्यंत तो त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधत होता. ज्यामुळे त्याला शाळेत खूपकाही ऐकावं लागत होतं.
अमित म्हणाला की, तरूण होत असताना त्याने त्याचं सत्य स्वीकारलं होतं, ज्याची त्याला पुढे जाण्यास मदत झाली. मात्र, त्याने नेहमीच फॅमिली फंक्शनमध्ये जाणं टाळलं. कारण नातेवाईकही त्याच्यावर कमेंट्स करतात. पण एका अशाच फॅमिली फंक्शनमध्ये एका मित्राने त्याची पियालीसोबत भेट घालून दिली आणि त्याचं आयुष्य बदललं.