Monalisa : "बिचारी खूप त्रस्त झालीय, सर्व लोक मागे लागलेत"; मोनालिसावर आली महाकुंभ सोडण्याची वेळ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 11:44 IST2025-01-21T11:43:36+5:302025-01-21T11:44:07+5:30
Monalisa In Mahakumbh : महाकुंभात व्हायरल होणारी मोनालिसा मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील महेश्वरची रहिवासी आहे. ती तिच्या कुटुंबासह रुद्राक्ष विकण्यासाठी महाकुंभमेळ्यात पोहोचली होती.

Monalisa : "बिचारी खूप त्रस्त झालीय, सर्व लोक मागे लागलेत"; मोनालिसावर आली महाकुंभ सोडण्याची वेळ?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका फोटोने धुमाकूळ घातला आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या मुलीचं नाव मोनालिसा आहे. मोनालिसा तिच्या सुंदर डोळ्यांमुळे आणि गोड हास्यामुळे व्हायरल झाली. गेल्या दोन-चार दिवसांत मोनालिसाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर आले आहेत. मोनालिसाबद्दल बरीच माहिती समोर आली आहे.
महाकुंभात व्हायरल होणारी मोनालिसा मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील महेश्वरची रहिवासी आहे. ती तिच्या कुटुंबासह रुद्राक्ष विकण्यासाठी महाकुंभमेळ्यात पोहोचली होती. मोनालिसाचे आजोबा म्हणतात, "आम्ही गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून महेश्वरमध्ये राहत आहोत. छोटी-छोटी कामं करत आहोत. सध्या माझा मुलगा त्याच्या कुटुंबासह वस्तू विकण्यासाठी महाकुंभाला गेला आहे."
मोनालिसा बद्दल विचारलं असता आजोबा म्हणाले, "प्रयागराजमध्ये आमच्या बिचाऱ्या मुलीला खूप त्रास होत आहे. तिला अजिबात काम करता येत नाही. सगळे लोक तिच्या मागे लागले आहेत. ते कॅमेरे घेऊन येतात आणि तिच्यासोबत बोलत राहतात. तिला त्यामुळे सामान अजिबात विकता येत नाही."
मोनालिसा काही व्हिडिओमध्ये असं म्हणताना दिसली की, लोक तिला काम करू देत नसल्याने ती रुद्राक्ष विकू शकत नाही. ती महाकुंभ सोडून घरी गेल्याचीही बातमी आली. तिच्यावर महाकुंभ सोडण्याची वेळ आली. यावर तिचे आजोबा म्हणतात की, "मोनालिसा अजून येथे आलेली नाही, ती महाकुंभमध्ये आहे. माझ्या मुलाने तिला नक्कीच सांगितलं आहे की आता तुला घरी पाठवावं लागेल, पण आतापर्यंत ती तिथून निघालेली नाही."