आलिशान जीवनाचा त्याग! ३ हजार कोटींच्या मालकाने घेतला संन्यास; बिझनेसमन बाबांची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 11:37 IST2025-02-25T11:36:34+5:302025-02-25T11:37:41+5:30
Mahakumbh Business Baba : आपली तब्बल तीन हजार कोटी रुपयांची संपत्ती आणि आलिशान जीवन सोडून संन्यासाचा मार्ग स्वीकारला आहे.

आलिशान जीवनाचा त्याग! ३ हजार कोटींच्या मालकाने घेतला संन्यास; बिझनेसमन बाबांची चर्चा
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात दररोज एक ना एक साधू किंवा बाबा बातम्यांमध्ये झळकत आहेत. याच दरम्यान एक बाबा जोरदार चर्चेत आहेत, ज्यांना लोक "बिझनेसमन बाबा" असं म्हणत आहेत. हे बाबा चर्चेत आहे कारण त्यांनी आपली तब्बल तीन हजार कोटी रुपयांची संपत्ती आणि आलिशान जीवन सोडून संन्यासाचा मार्ग स्वीकारला आहे.
आयआयटी बाबा, बुलेट बाबा, रुद्राक्ष बाबा आणि राजदूत बाबा यांसारख्या अनेक लोकांनी महाकुंभात आधीच लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता बिझनेस बाबांनी त्यांच्या अनोख्या प्रवासाने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. पूर्वी ते एक मोठे उद्योगपती होते आणि व्यावसायिक जगात त्यांचं मोठं नाव होतं. त्यांच्याकडे महागडी घरं, गाड्या आणि आलिशान जीवनशैली होती. पण एके दिवशी त्यांनी अचानक सर्व काही सोडून साधू होण्याचा निर्णय घेतला.
बिझनेसमन बाबा म्हणतात की, भौतिक सुखसोयी त्यांना खरी शांती देऊ शकल्या नाहीत. त्यांनी स्वतःला ज्ञानाच्या शोधात समर्पित केलं. आता साधूंच्या परंपरेनुसार बाबा महाकुंभात भगवे कपडे परिधान करताना दिसतात. त्यांचा साधेपणा आणि भक्तीभाव पाहण्यासारखा आहे.
महाकुंभाला येणाऱ्या भाविकांमध्ये या बाबांची हटके गोष्ट चर्चेचा विषय बनली आहे. त्यांच्या साधेपणाने आणि त्यागाने लोक खूप प्रभावित होत आहेत. महाकुंभात त्यांचं एक वेगळंच आकर्षण आहे, जिथे लोक त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी येत आहेत. बाबा मानतात की खरा आनंद संपत्तीत नाही तर देवाच्या भक्ती आणि उपासनेत आहे. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.