Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 19:41 IST2025-10-28T19:38:36+5:302025-10-28T19:41:44+5:30
Inspiring Love Story: निराधार जोडप्याची अनोखी प्रेमकहाणी...

Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका तरुणाने आणि मूत्रपिंडाच्या गंभीर समस्येने त्रस्त असलेल्या एका तरुणीने 'किडनी दान' करण्याच्या अटीवर केलेले लग्न कसे एका गोड प्रेमकथेत फुलले, याची एक अविश्वसनीय कथा चीनमधून समोर आली. मृत्यूची अट ठेवून केलेला हा करार अखेर दोघांच्याही जीवनाचा आधार बनला आणि दोघांनाही आरोग्य व प्रेम मिळाले.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टमधील एका वृत्तानुसार, २०१४ मधील हे प्रकरण आजही खूप प्रेरणादायी ठरत आहे. शांक्सी प्रांतातील २४ वर्षीय वांग जिओ हिला 'युरेमिया' झाल्याचे निदान झाले. प्रत्यारोपणाशिवाय जगण्यासाठी तिच्याकडे फक्त एक वर्ष असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नातेवाईकांमध्ये दाता न मिळाल्याने निराश झालेल्या वांगने 'कर्करोग मदत गटात' एक अपारंपरिक लग्नाची जाहिरात पोस्ट केली. या जाहिरातीनुसार, कर्करोगाने गंभीर आजारी असलेल्या पुरुषाशी लग्न करण्याची तिची तयारी होती, जेणेकरून त्याच्या मृत्यूनंतर तिला त्याची किडनी मिळेल. काही दिवसांतच, २७ वर्षीय यु जियानपिंग याने वांगच्या जाहिरातीला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, त्याचा रक्तगट वांगच्या रक्तगटाशी जुळत होता. यु कर्करोगाशी झुंज देत होता आणि त्याच्या वडिलांनी उपचारांसाठी घर विकले. जुलै २०१३ मध्ये दोघांनी लग्न केले.
दोघांत नेमका कोणता करार झाला?
- लग्न गुप्त ठेवणे.
- आर्थिक व्यवहार स्वतः सांभाळणे.
- युच्या मृत्यूनंतर तो त्याची एक किडनी वांगला दान करेल.
- किडनीच्या बदल्यात वांग युच्या उपचारादरम्यान त्याची काळजी घेईल.
निराधारच बनले एकमेकांचा आधार
हा करार हळूहळू एका गोड प्रेमाच्या बंधात फुलला. दोघे दररोज एकमेकांशी गप्पा मारू लागले आणि त्यांच्या आरोग्याच्या अपडेट्स शेअर करू लागले. वांगच्या खेळकर आणि आशावादी स्वभावामुळे युच्या चेहऱ्यावर हसू येऊ लागले आणि त्याचे मनोबल वाढले. युच्या अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी पैसे जमा करण्यासाठी, वांगने रस्त्यावर फुलांचे गुच्छ बनवून विकायला सुरुवात केली.
दोघांनाही मिळाले जीवनदान
विक्री आणि बचतीद्वारे वांगने युच्या शस्त्रक्रियेसाठी ५००,००० युआन (सुमारे $७०,०००) इतकी रक्कम जमा केली. जून २०१४ पर्यंत, युची प्रकृती चांगली झाली. वांगची प्रकृती देखील सुधारली असून तिचे डायलिसिस सत्र आठवड्यातून दोनदा कमी होऊन महिन्यातून एकदा झाले. डॉक्टरांनी तिला आता किडनी प्रत्यारोपणाची गरज नाही, असे सांगितले. आज दोघेही निरोगी जीवन जगत आहेत. फेब्रुवारी २०१५ मध्ये, या जोडप्याने स्थानिक रेस्टॉरंटमध्ये लग्नाचे रिसेप्शन दिले. या दोघांची प्रेम कहाणी नंतर 'व्हिवा ला विडा' या चित्रपटात रूपांतरित झाली. २०२४ मध्ये चीनमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने २७६ दशलक्ष युआनपेक्षा जास्त कमाई केली.