बंगळुरुमध्ये धावत्या Lamborghini ने घेतला पेट; गौतम सिंघानियांनी कंपनीवर उपस्थित केले प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 18:26 IST2025-08-05T18:25:53+5:302025-08-05T18:26:59+5:30
Lamborghini Fire Case: बंगळुरुमधील घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

बंगळुरुमध्ये धावत्या Lamborghini ने घेतला पेट; गौतम सिंघानियांनी कंपनीवर उपस्थित केले प्रश्न
Lamborghini Fire Case: देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रेमंड ग्रुपचे एमडी गौतम सिंघानिया(Gautam Singhania) यांनी लॅम्बोर्गिनी कंपनीविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. अलीकडेच बंगळुरुमध्ये एका धावत्या लॅम्बोर्गिनी Aventador कारलाआग लागल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता सिंघानिया यांनी पुन्हा एकदा Lamborghini ब्रँडवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कारला लागलेल्या आगीचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "आणखी एक दिवस, आणखी एक लॅम्बोर्गिनीला आग. आता ही 'दुर्मिळ घटना' राहिलेली नाही. ही सामान्य घटना झाली आहे. लॅम्बोर्गिनी यावर गप्प का आहे?" गाड्यांना आग का लागतीये? या गाड्या सुरक्षित आहेत का? या गाड्यांना भारतात विक्रीची परवानगी द्यायला हवी का?" असे प्रश्न त्यांनी विचारले.
यापूर्वीही केलेली टीका
गौतम सिंघानिया यांनी लॅम्बोर्गिनीच्या तांत्रिक समस्यांबद्दल सोशल मीडियावर अनेक वेळा पोस्ट केल्या आहेत. त्यांनी Huracan, Revuelto आणि Aventador सारख्या कारमधील तांत्रिक त्रुटींवर भाष्य केले होते. अलीकडेच त्यांनी Revuelto च्या टेस्ट ड्राइव्ह दरम्यान इलेक्ट्रिक समस्येचा व्हिडिओ देखील शेअर केला होता, ज्यामध्ये कार रस्त्याच्या मधोमध अचानक बंद पडली होती.
काय आहे बंगळुरुची घटना?
बंगळुरूमध्ये एका धावत्या अवेंटाडोरला आग लागली. ही कार सोशल मीडिया इन्फ्लुएंसर संजीव संजू (Namma Mane Maga Sanju) यांची होती. त्यांनी सांगितले की, ही आग पेट्रोल गळतीमुळे लागली होती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. कारला आग लागली, तेव्हा बहुतांश लोक फक्त व्हिडिओ बनवत होते. फक्त दोनच लोकांनी त्यांना मदत केली. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली.