महाराष्ट्रातमराठीच... या आंदोलनात आता तोंड गोड करणारी कॅडबरी डेअरी मिल्कही उतरलीये की काय? असा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो. कॅडबरी चॉकलेटचे नवीन रुप तर असंच काहीतरी सांगत आहे. हो, जरा जरा मराठी म्हणत कॅडबरी आता मराठी शिकवू लागली आहे. कॅडबरीच्या नवीन रॅपरवर इंग्रजी आणि मराठी संवादाचा छोटी छोटी वाक्य लिहिली गेली आहे. कॅडबरीच्या या उपक्रमाचे लोकांकडून कौतुक होत असून, काहींनी राज ठाकरेंच्या भूमिकेचाही उल्लेख केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कॅडबरी चॉकलेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात इंग्रजी आणि मराठीतील वाक्ये लिहिली आहेत. हा फोटो बघून लोक प्रचंड कौतुक करत आहेत.
कॅडबरीवर काय लिहिलंय?
'जरा जरा मराठी...', 'थँक यू - धन्यवाद', 'व्हॉट?-काय', 'हाऊ आर यू?-कसे आहात?', 'सॉरी - माफ करा', 'नीड हेल्प - मदत हवी का?', लिटल - जरा', 'इव्हिनिंग - संध्याकाळ'
कॅडबरीच्या मराठीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळानेही डेअर मिल्कला मंडळ आभारी आहे म्हणत प्रतिसाद दिला आहे. काहींनी खूप चांगला उपक्रम असल्याचे म्हटले आहे. काहींचं म्हणणं की मनसेचा हा परिणाम आहे.
राज ठाकरेंचं वाक्य आठवतंय
एका यूजरने म्हटले आहे, 'तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम राहा, जग तुमची नक्कीच दखल घेईल हे राज ठाकरे यांचे वाक्य आज मला हे पाहून आठवले,. कॅडबरी डेअरी मिल्क यांनी एक अनोखा असा छोट्या रूपात का होईना पण मराठी शिकवण्यासाठी एक गोड उपक्रम राबवला आहे व यासाठी डेअरी मिल्कचे नक्कीच तोंडभरून कौतुक केले पाहिजे.'
एका यूजरने तर राज्य सरकारनेही मराठीच्या संवर्धनासाठी असे उपक्रम राबवले पाहिजे असे सूचवले आहे. 'असे उपक्रम महाराष्ट शासन, मुंबई, पुणे, नाशिक सारख्या महानगर पालिकांनी आपल्या जाहिरातीतून राबवले पाहिजेत. तसेच मराठी व्यावसायिकांनी देखील आपल्या उत्पादनांवर केले पाहिजेत. हे संरचनात्मक भाषेचं संवर्धन आणि प्रसार आहे', असे या यूजरने म्हटलं आहे.