फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 21:58 IST2025-10-15T21:56:40+5:302025-10-15T21:58:04+5:30
Food Delivery Scam: एका बेरोजगार तरुणाने फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना लावून तब्बल दोन वर्षे ऑनलाईन ऑर्डर केलेल जेवण फुकटात खाल्ले.

AI Image
जपानमध्ये एका बेरोजगार तरुणाने फूड डिलिव्हरी ॲपच्या रिफंड पॉलिसीमधील त्रुटीचा फायदा घेत कंपनीला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागोया येथील या तरुणाने ॲपच्या नियमांमधील लूपहोलचा वापर केला आणि एकही रुपया खर्च न देता तब्बल दोन वर्षे फुकटात जेवण खाल्ले.
ताकुया हिगाशिमोतो (वय, ३८) असे या तरुणाचे नाव आहे. हिगाशिमोतोने डेमा-कॅन फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना लावला. हिगाशिमोतो हा या फूड डिलिव्हरी ॲपवरून जेवण ऑर्डर करायचा आणि त्यानंतर अन्न मिळाले नाही अशी खोटी तक्रार ॲपवर करायचा आणि कंपनीकडून रिफंड मिळवायचा. हिगाशिमोतोने दोन वर्षांत कंपनीची ३.७ दशलक्ष येन (अंदाजे २१ लाख रुपये) इतकी फसवणूक केली.
हिगाशिमोतोने पकडले जाऊ नये म्हणून कंपनीच्या सिस्टमला बायपास करण्यासाठी एक-दोन नव्हे, तर १२४ बनावट खाती तयार केली. प्रत्येक वेळी तो नवीन नाव, खोटा पत्ता आणि प्रीपेड सिम कार्ड वापरत होता, ज्यामुळे त्याचा मागोवा घेणे कठीण झाले होते. मात्र, ३० जुलै रोजी ताकुयाने पुन्हा आईस्क्रीम आणि चिकन स्टेक ऑर्डर करून रिफंड मागितला, तेव्हा कंपनीला संशय आला. सखोल तपासणीनंतर हिगाशिमोतोने १,०९५ वेळा अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे उघड झाले आणि त्याला अटक करण्यात आली.
या घटनेनंतर डेमा-कॅनसह इतर फूड डिलिव्हरी कंपन्यांनी त्यांच्या आयडी पडताळणी आणि ॲलर्ट सिस्टीम कडक करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे, नागरिकांनी हिगाशिमोतोच्या कृत्यांवर संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी 'जर त्याने ही बुद्धी चांगल्या कामात लावली असती, तर तो यशस्वी झाला असता,' अशी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेने जपानमधील ॲप-आधारित फसवणुकीच्या धोक्यावर प्रकाश टाकला आहे.