Indonesian Boat Race Video : तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल, तर 'ऑरा फार्मिंग बोट रेसिंग किड'चे नाव नक्कीच ऐकले असेल. हा मुलगा इंडोनेशियातील असून, रायन अर्कान (Rayyan Arkan Dikha) असे त्याचे नाव आहे. 11 वर्षीय रायन सध्या सोशल मीडिया जगतात धुमाकूळ घालतोय. याचे कारण म्हणजे, त्याचा एका बोटीवर डान्स करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. त्याच्या डान्स स्टेप लोकांना इतक्या आवडल्या की, जगभरातील अनेक खेळाडू त्याची कॉपी करत आहेत.
फक्त मनोरंजन नाही, ऐतिहासिक परंपरा...तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा डान्स फक्त मनोरंजनासाठी नाही, तर इंडोनेशियातील पारंपारिक बोट शर्यती पाकू जलूरचा (Pacu Jalur) एक भाग आहे. या शर्यतीवेळी तोगाक लुआन नावाचा एक खास नर्तक असतो, जो संघाला प्रोत्साहन देण्यासाठी बोटवर डान्स करतो. ही परंपरा इंडोनेशियाच्या रियाउ प्रदेशात दरवर्षी होते. ही परंपरा आणि डान्समुळे रायन एक सांस्कृतिक आयकॉन बनला आहे.
'ऑरा फार्मिंग' म्हणजे काय?या इंडोनेशियन मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर 'ऑरा फार्मिंग' नावाचा एक ट्रेंड सुरू झाला आहे. जगभरातील नेटीझन्स आणि प्रसिद्ध खेळाडू या मुलाच्या डान्स स्टेप कॉपी करत आहेत. ऑरा फार्मिंगचा अर्थ लोकांना ऊर्जा देणारा आणि वातावरण चैतन्यशील बनवणारा क्षण. रायनची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, प्रसिद्ध सेलिब्रिटी, खेळाडू आणि सोशल मीडिया इन्ल्फ्लुएंसर रायनच्या डान्सची कॉपी करत आहेत.