झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 18:44 IST2025-12-22T18:43:35+5:302025-12-22T18:44:15+5:30
सॉफ्टवेअर इंजिनिअर असा आहे, ज्याने झाडू मारण्याचं काम आनंदाने स्वीकारलं आहे. हे जाणून अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

फोटो - Pexels
भारतात बी.टेक पूर्ण करण्यासाठी ४ वर्षे लागतात, त्यानंतर एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरीही मिळते. जर तुमच्याकडे इंजिनिअरिंगची पदवी असेल आणि तुम्हाला चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली असेल, तर तुम्ही रस्त्यावर झाडू मारण्याचं काम कराल का? साहजिकच तुमचं उत्तर 'नाही' असंच असेल. मात्र एक भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर असा आहे, ज्याने रशियामध्ये झाडू मारण्याचं काम आनंदाने स्वीकारलं आहे. हे जाणून अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
साधारणपणे भारतीय लोक परदेशात नोकरीच्या चांगल्या संधींसाठी जातात. बहुतांश भारतीय टेक सेक्टरमध्ये काम करण्यासाठी परदेशात जातात. मात्र रशियात पोहोचलेल्या १७ भारतीय वर्कर्सची गोष्ट काहीशी वेगळी आहे. ते तिथे कोणतीही हाय-फाय नोकरी करण्यासाठी आलेले नाहीत, तर त्यांचं काम रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी झाडू मारणं हे आहे. या कामासाठी त्यांना दरमहा १.१ लाख रुपये पगार मिळत आहे. या पगाराद्वारे ते भारतात असलेल्या आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात सध्या १७ भारतीय कामगारांचा एक ग्रुप रस्त्यांची साफसफाई करत आहे. हे सर्व भारतीय कर्मचारी ४ महिन्यांपूर्वीच रशियात आले आहेत. ते तिथे 'कोलोम्याज्स्कोये' नावाच्या रस्ते देखभाल करणाऱ्या कंपनीसाठी काम करतात. कंपनीतर्फे कर्मचाऱ्यांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, सर्व प्रकारचे कागदोपत्री गोष्टीही कंपनीच पाहत आहे. या कर्मचाऱ्यांचं मुख्य काम रस्ते साफ करणं आहे जेणेकरून शहरात स्वच्छता राहील.
Street cleaners from India start working in St. Petersburg
— NEXTA (@nexta_tv) December 20, 2025
The first group arrived back in September to fill the labor shortage.
Some Indians claim they previously worked in the IT sector. For example, one of them says he was an AI developer at Microsoft.
At the same time, the… pic.twitter.com/uiokaaEYqp
रशियन न्यूज आउटलेट 'फोन्टंका'च्या मते, या भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये २६ वर्षीय मुकेश मंडलचा समावेश आहे. मुकेशने दावा केला आहे की, तो यापूर्वी भारतात सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत होता. त्याने सांगितलं की, "मी प्रामुख्याने मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे आणि AI, चॅटबॉट, GPT सारखी नवीन टूल्स वापरली आहेत. मी डेव्हलपर राहिलो आहे."
मुकेश मंडलने पुढे सांगितलं की, तो येथे चांगल्या पगारासाठी काम करत आहे. रशियात खूप काळ राहण्याचा त्याचा कोणताही प्लॅन नाही. तो म्हणाला, "माझा येथे फक्त एक वर्ष राहण्याचा विचार आहे, जेणेकरून मी थोडे पैसे कमवून आपल्या देशात परत जाऊ शकेन. मी फक्त येथे माझे काम करत आहे, जे रस्ते साफ करणं आहे. हा तुमचा देश आहे आणि मी काय करतो हे तुम्हाला समजलं पाहिजे."
जेव्हा मुकेशला विचारण्यात आलं की, तो कोडिंग सोडून साफसफाई का करत आहे, तेव्हा त्याने उत्तर दिलं, "मी भारतीय आहे आणि माझ्यासाठी कोणतंही काम छोटं नाही. काम हाच माझ्यासाठी देव आहे. तुम्ही कुठेही काम करू शकता, मग ते टॉयलेट असो किंवा रस्ता. हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे आणि माझी जबाबदारी आहे." सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.