पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देणार, ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल असा इशारा दिला. त्यानंतर १५ दिवसांनी ऑपरेशन सिंदूर हाती घेत भारतीय सैन्याने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट करून उद्ध्वस्त केले. भारत-पाकिस्तान यांच्यातील संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने खबरदारी म्हणून सगळीकडे सिविल डिफेन्स मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले होते. त्यात काही मिनिटांसाठी ब्लॅकआऊटचा सराव घ्यायचा होता. हल्ल्याच्या परिस्थितीत नागरिकांना आव्हानांना तोंड कसे द्यायचे याचे प्रशिक्षण देण्यात येत होते.
ब्लॅकआऊटवेळी विद्युत विभाग केवळ पॉवर ऑफ करू शकते जे त्यांच्या नियंत्रणात आहे. परंतु अशावेळी बॅटरी, इनवर्टर लोक सुरू ठेवतात. इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे ज्यात ब्लॅकआऊटवेळी लाईट सुरूच ठेवणाऱ्या दुकानदाराला एका वयोवृद्धाने चांगलाच चोप दिला. हा व्हायरल व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट नाही. या व्हिडिओत दिसते की, लाईट सुरू ठेवल्यामुळे वयोवृद्ध व्यक्ती दुकानदाराला काठीने मारतो. हा व्हिडिओ ब्लॅकआऊटशी जोडून व्हायरल होत आहे. त्यावर लोकांच्याही भन्नाट प्रतिक्रिया उमटत आहेत.
व्हिडिओत काठी घेऊन वयोवृद्ध व्यक्ती ज्यूस विक्री करणाऱ्या दुकानदाराच्या दिशेने जातो. न्यू दिल्ली ज्यूस कॉर्नर असं नाव असणाऱ्या दुकानाची वीज सुरू असते. तेव्हा वयोवृद्ध व्यक्ती दुकानात असणाऱ्या व्यक्तीला काठीने मारहाण करते. काठी पडताच दुकानदार लाईट बंद करतो. १९ सेकंदाचा हा व्हिडिओ असून त्यात ब्लॅकआऊट न करणाऱ्या दुकानदाराला आजोबांनी चोपला असं म्हणत व्हायरल केला जात आहे. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये युजर्स दुकानदाराला फटकारताना दिसतात. लाखो लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहचला आहे.
का घेतला ब्लॅकआऊट?
७ मे रोजी गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना सिविल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित करण्याची सूचना दिली होती. १९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदाच अशाप्रकारची सूचना देण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक घेत आहेत. संभाव्य एक्शन प्लॅनवर काम केले जात आहे. त्याआधी ब्लॅकआऊटचा सराव अनेक ठिकाणी घेण्यात आला. त्यात शहरातील सर्व लाईट बंद करण्यात येतात. जेणेकरून शत्रूच्या विमानांना टार्गेट शोधता येत नाही.