गो इंडिगोने आता एअर इंडियाची जागा घेतली; प्रवाशाकडून विंडो सीटचे जादा पैसे घेतले पण विंडोच नाही दिली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:34 IST2025-02-10T12:33:52+5:302025-02-10T12:34:18+5:30
सरकारी असताना एअर इंडिया दर आठवड्याला सोशल मीडियात चर्चेत असायची. आता टाटाने घेतल्यापासून ही संख्या कमी झाली आणि गो इंडियाच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

गो इंडिगोने आता एअर इंडियाची जागा घेतली; प्रवाशाकडून विंडो सीटचे जादा पैसे घेतले पण विंडोच नाही दिली...
एअर इंडियाची जागा आता हळूहळू गो इंडिगोने घ्यायला सुरुवात केली आहे. सरकारी असताना एअर इंडिया दर आठवड्याला सोशल मीडियात चर्चेत असायची. आता टाटाने घेतल्यापासून ही संख्या कमी झाली आणि गो इंडियाच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. गो इंडिगोची विमाने आता नको तेवढी लेट होऊ लागली आहेत. क्रू मेंबरची वाट पाहत दोन-दोन तास एकाच विमानतळावर थांबवून ठेवण्यासारखे प्रसंग घडले आहेत. अशातच आता एका प्रवाशाकडून विंडो सीटसाठी जादाचे पैसे उकळल्याचे समोर येत आहे.
हा तर मोठा घोटाळाच आहे. विंडो सीट हवी असल्याने त्या प्रवाशाने जादा पैसे दिले होते. परंतू, त्याच्या वाट्याला मोठा झोल आला आहे. त्याने याचा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. या व्हिडीओत तो विंडो कुठे आहे, असा सवाल करताना दिसत आहे.
चेन्नईचा स्पोर्ट कमेंटेटर प्रदीप मुथु याने आपला सेल्फी शेअर केला आहे. गो इंडिगोला टॅग करत त्याने विंडो सीटसाठी जादा पैसे दिले आहेत. पण विंडो कुठे आहे, असा सवाल त्याने केला आहे. प्रत्यक्षात त्याला विंडो सीटच्या रांगेतच बसविण्यात आले आहे, परंतू त्याच्या बाजुला विंडो नाही तर विमानाची भिंत आहे.
यावर इंडिगोकडून मोघम, नमस्कार, आम्हाला हे जाणून काळजी वाटत आहे. कृपया तुमचे फ्लाइट डिटेल्स (PNR) DM द्वारे शेअर करा जेणेकरून आम्ही तुम्हाला अधिक मदत करू शकू, असा रिप्लाय देण्यात आला आहे. आता इंडिगो काय पुन्हा त्या प्रवाशाला घेऊन विंडो सीटचा प्रवास घडवणार आहे की पैसे माघारी देणार आहे, असाही सवाल यावरून लोक विचारत आहेत. अनेकांनी या रिप्लायला देखील ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
या पोस्टवर लोक आपापला अनुभव शेअर करत आहेत. कोणी म्हणाले या लोकांनी पाणी पण नाही दिले. काहींनी तर यांच्या सर्व्हिसप्रमाणे विंडो देखील गायब आहे, असे म्हटले आहे.