कर्मचारी म्हणतो, ‘त्या’ झुरळाला मरेपर्यंत फाशी द्या..! विमानातील नोंदीनंतर सोशल मीडियावर धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 07:09 IST2025-10-29T07:09:05+5:302025-10-29T07:09:19+5:30
झुरळाला मरेपर्यंत फाशी देण्यात यावी,’ अशी नोंद लॉगबुकमध्ये

कर्मचारी म्हणतो, ‘त्या’ झुरळाला मरेपर्यंत फाशी द्या..! विमानातील नोंदीनंतर सोशल मीडियावर धुमाकूळ
मुंबई : अपघात आणि अन्य कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेली एअर इंडिया कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यंदाच्या चर्चेचे निमित्त ठरले आहे ते एक झुरळ; कारण या झुरळाला मरेपर्यंत फाशी देण्यात यावी, अशी नोंद खुद्द कंपनीच्याच एका कर्मचाऱ्याने विमानाच्या लॉगबुकमध्ये केली. त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, हा विषय नेटकऱ्यांच्या मनोरंजनाचा विषय बनला आहे.
एअर इंडियाच्या दिल्ली ते दुबई या विमान प्रवासादरम्यान २४ ऑक्टोबर रोजी एका प्रवाशाला विमानात झुरळ असल्याचे दिसले. त्याने ही गोष्ट केबिन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. कर्मचाऱ्यांनी ते झुरळ पकडले. विमानप्रवास पूर्ण झाल्यानंतर या प्रवासात ज्या काही घटना होतात किंवा प्रवाशांच्या तक्रारी असतात, त्यांची नोंद लॉगबुकमध्ये करण्यात येते.
एअर इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्याने विमानात झुरळ सापडल्यानंतर त्या झुरळाला मरेपर्यंत फाशी देण्यात यावी, अशी नोंद लॉगबुकमध्ये केली आहे. ही नाेंद व्हायरल झाली आहे.
‘ब्लॅक वॉरंट’ जारी केले का?
नोंदीनुसार पुढील प्रवासासाठी कंपनी काळजी घेते. मात्र, झुरळ सापडल्याची घटना घडल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्याने, ‘विमानप्रवासादरम्यान प्रवाशाला एक जिवंत झुरळ सापडले असून, या झुरळाला मरेपर्यंत फाशी देण्यात यावी,’ अशी नोंद लॉगबुकमध्ये केली.
सोशल मीडियावर या लॉगबुकचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांनी खुसखुशीत कॉमेंट करण्यात आल्या आहेत. फाशी कशी देणार, कुठे देणार, ब्लॅक वॉरंट जारी झाले आहे का, अशा प्रकारच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.