खासगी कंपन्यांमध्ये कर्मचारी नोकऱ्या सोडणे हे नेहमी सुरूच असते. पण, सद्या सोशल मीडियावर एक राजीनामबाबत एक पोस्ट व्हायरल झाली आहे. लिंक्डइनवर एका एचआर प्रोफेशनलच्या पोस्टमुळे एक नवीन वाद सुरू झाला आहे. हे प्रकरण एका कर्मचाऱ्याशी संबंधित आहे. या कर्मचाऱ्याने पगार मिळाल्यानंतर अवघ्या ५ मिनिटांत राजीनामा दिला.
एचआरने केलेल्या पोस्टमध्ये काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये हे बरोबर आहे का? हे व्यावसायिक नीतिमत्तेच्या विरुद्ध आहे का? त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, "पगार सकाळी १० वाजता जमा झाला आणि राजीनामा ईमेल १०.०५ वाजता आला.
एचआरने काय म्हटले?
'ऑनबोर्डिंग आणि ट्रेनिंग टीमने नवीन कर्मचाऱ्यावर खूप वेळ आणि कठोर परिश्रम केले होते, परंतु इतक्या लवकर नोकरी सोडणे सर्वांसाठी निराशाजनक आहे', असं एचआरने पोस्टमध्ये म्हटले आहे. कंपनीने संधी, विश्वास आणि व्यासपीठ दिले. मग पगार मिळाल्यानंतर ५ मिनिटांनी नोकरी सोडणे, हे बरोबर आहे का?, असा सवाल एचआरने केला.
'अचानक राजीनामा देणे हे त्या व्यक्तीमध्ये हेतू आणि जबाबदारीचा अभाव दर्शवते. जर काही समस्या असती तर त्यावर उघडपणे चर्चा करता आली असती आणि मदत मागता आली असती. प्रत्येक कामात आव्हाने असतात आणि खरी वाढ केवळ पहिल्या पगारातून नव्हे तर संयम आणि कठोर परिश्रमातून होते', असंही या पोस्टमध्ये म्हटले आहे.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
ही पोस्ट व्हायरल झाली आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली. एका वापरकर्त्याने लिहिले की, "कर्मचारी चुकीचा नाही आणि एचआरने सोशल मीडियावर अशा गोष्टी लिहू नयेत."
दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, "पगार म्हणजे आधीच केलेल्या कामाचा मोबदला आहे, उपकार नाही. जर त्याने पगार घेतल्यानंतर राजीनामा दिला असेल तर त्याने त्याचे कर्तव्य पार पाडले आहे आणि बहुतेक प्रकरणांमध्ये नोटीस कालावधी देखील असतो.