बाबा, दारु पिऊन गाडी चालवू नका, मला तुमची गरज आहे; महिला पोलिसाने मुलाकडून पित्याला साद घातली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:48 IST2025-01-08T12:48:03+5:302025-01-08T12:48:26+5:30
Dont Drink and Drive Video: समस्त पित्यांना रडू कोसळवेल असा इमोशनल व्हिडीओ... महिला पोलिसाचीही होतेय स्तुती...

बाबा, दारु पिऊन गाडी चालवू नका, मला तुमची गरज आहे; महिला पोलिसाने मुलाकडून पित्याला साद घातली
समस्त पित्यांना रडू कोसळवेल असा इमोशनल व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. लहान मुलाला घेऊन त्याचे वडील स्कूटरवरून जात होते. थर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. स्कूटरचालक दारु प्यायलेला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याने मुलाला जवळ घेत त्याच्या पित्याला दारु पिऊ नको, मला तुझी गरज आहे, असे मुलाच्या तोंडून सांगायला लावत पित्याचे समुपदेशन केले. यानंतर त्या स्कूटरचालकाला रडू कोसळले.
हैदराबादच्या उप्पल नल्लाचेरुवुमध्ये ही घटना घडली आहे. एक स्कूटर चालक त्याच्या लहान मुलाला घेऊन स्कूटर चालवत होता. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबविले. स्कूटर चालक नशेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी महिला पोलिसाने त्या मुलाला कवेत घेत त्याच्या बापाला भावनिक आवाहन केले.
वाहतूक पोलीस निरीक्षक लक्ष्मी माधवी यांनी मुलाला हे आवाहन करण्यास लावले व पित्याकडून प्रॉमिस घेतले. बाबा, दारु पिऊन गाडी चालवू नका, मला तुमची गरज आहे, असे त्यांनी त्या लहान मुलाला म्हणण्यास सांगितले. मुलाची ही साद ऐकून पित्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याने मुलाला जवळ घेत मिठी मारली व पुन्हा दारु पिणार नाही असे आश्वासन दिले.
A father caught drunk driving gets a life-changing lesson as his young son counsels him on road safety, leaving him in tears. 🚗#DrunkDriving#Emotional#LokmatTimespic.twitter.com/h9pVEhBp0l
— Lokmat Times (@lokmattimeseng) January 7, 2025