या मुस्लिम देशात सापडले 5000 वर्षे जुने वाइनचे शेकडो जार; अनेक मोठी रहस्ये उलगडणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 20:39 IST2025-05-22T20:39:27+5:302025-05-22T20:39:57+5:30
हा शोध सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

या मुस्लिम देशात सापडले 5000 वर्षे जुने वाइनचे शेकडो जार; अनेक मोठी रहस्ये उलगडणार...
इजिप्तमधून एक चकीत करणारी बाब समोर आली आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना येथे 5 हजार वर्षे जुने शेकडो वाइन जार सापडले आहेत. विशेष म्हणजे, यापैकी बरेच अजूनही सीलबंद आहेत. हा शोध असाधारण मानला जातोय आहे. कारण, यातून त्या काळातील अनेक गोष्टींचा उलगडा होण्यास मोठी मदत होणार आहे.
हे वाइन जार अबिडोस येथील राणी मेरेट नीथच्या थडग्यात सापडले आहेत. व्हिएन्ना विद्यापीठाच्या क्रिस्टियाना कोहलर यांच्या नेतृत्वाखाली हा शोध लागला आहे. यामुळे प्राचीन इजिप्शियन लोक वाइन कसे तयार करायचे, कसे जतन करायचे आणि कसे वापरायचे, हे समजून घेणे सोपे होईल. राणी मेरेट नीथ ही शक्तिशाली इजिप्शियन राजघराण्यातील होती, ज्यांनी सुमारे इसवी पूर्व 3000 वर्षे राज्य केले.
या भांड्याची स्थिती आणि जतन केलेल्या पद्धतीमुळे हा एक दुर्मिळ आणि वैज्ञानिकदृष्ट्या मौल्यवान शोध आहे. येथील शिलालेखांच्या आधारे, त्या काळात वाइन किती महत्त्वाचे होते आणि ते इजिप्शियन उच्चभ्रू लोकांच्या दफनविधीचा एक भाग असावे, असा अंदाज लावला जातोय. या जारांच्या रासायनिक विश्लेषणातून प्राचीन वाइनची रचना, द्राक्षाची विविधता, किण्वन पद्धती आणि वापरलेले इतर घटक उघड होण्याची अपेक्षा आहे.
या जारमध्ये द्राक्ष सापडले असून, यामुळे संशोधकांना त्या काळातील द्राक्षशेतीचा अभ्यास करण्यास आणि आधुनिक द्राक्षांच्या जातींशी अनुवांशिक संबंध शोधण्यास मदत होईल.
राजघराण्यातील व्यक्तींच्या थडग्यांमध्ये वाइन पेट्या ठेवण्यावरुन सुरुवातीच्या इजिप्शियन समाजात वाइनचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व दिसून येते. वाइन हे केवळ एक पेय नव्हते, तर ते एक प्रतिष्ठेचे प्रतीक होते.