"जेवण टेस्टी होतं, मी संपवलं...तक्रार करायची असेल तर करा", डिलिव्हरी बॉयच्या रिप्लायनं संतापला कस्टमर अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 16:55 IST2022-10-30T16:53:16+5:302022-10-30T16:55:53+5:30
एका व्यक्तीनं ऑनलाइन जेवण ऑर्डर केलं. आता ऑर्डर येईल या आशेनं तो डिलिव्हरी बॉयची वाट पाहात बसला.

"जेवण टेस्टी होतं, मी संपवलं...तक्रार करायची असेल तर करा", डिलिव्हरी बॉयच्या रिप्लायनं संतापला कस्टमर अन्...
एका व्यक्तीनं ऑनलाइन जेवण ऑर्डर केलं. आता ऑर्डर येईल या आशेनं तो डिलिव्हरी बॉयची वाट पाहात बसला. भूकेनं व्याकूळ होता. पण बराच वेळ झाला तरी डिलिव्हरी काही आली नाही. इतक्यात डिलिव्हरी बॉयचा मेसेज आला आणि तो वाचून ग्राहकाची तळपायाची आग मस्तकातच गेली. कारण डिलिव्हरी बॉयनं ग्राहकाच्या जेवणावर रस्त्यातच ताव मारला आणि ऑर्डर पोहोचवणं शक्य नसल्याचं म्हटलं.
डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकामध्ये झालेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. चॅटच्या सुरुवातीलाच डिलिव्हरी बॉयनं ग्राहकाला सॉरी म्हटलं आहे. यावर ग्राहकानं नेमकं काय झालं? अशी विचारणा डिलिव्हरी बॉयला केली. त्यानंतर ग्राहकानं जे वाचलं ते त्याच्यासाठी आश्चर्यकारक असं होतं. "जेवण खूप टेस्टी होतं. मी ते खाऊन टाकलं. तुम्ही याची कंपनीकडे तक्रार करू शकता", असा मेसेज डिलिव्हरी बॉयनं ग्राहकाला पाठवला आहे.
ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Deliveroo च्या कर्मचाऱ्याचा मेसेज वाचून ग्राहकानंही संताप व्यक्त केला आणि डिलिव्हरी बॉयला तू खूप वाईट व्यक्ती असल्याचं म्हटलं. त्यावरही डिलिव्हरी बॉयनं मला काहीच फरक पडत नाही असं म्हणत आपण केलेल्या कृत्याबाबत कोणतंही शल्य नसल्याचं दाखवून दिलं.
Deliveroo driver has gone rogue this morning pic.twitter.com/sFNMUtNRrk
— Bags (@BodyBagnall) October 28, 2022
ग्राहकाही होता प्रचंड भुकेला
'द सन'च्या माहितीनुसार हे प्रकरण ब्रिटनमधील आहे. ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीचं नाव लियाम बॅगनॉल असं आहे. तो भुकेनं व्याकूळ होता आणि त्यानं Deliveroo वरुन जेवण ऑर्डर केलं होतं. पण डिलिव्हरी बॉयनं पार्सल मध्येच उघडलं आणि जेवण फस्त करुन टाकलं. इतकंच नाही, तर त्यानं स्वत:हून ग्राहकाला मेसेज करुन याची माहिती दिली आणि पार्सल पोहोचवणं शक्य नसल्याचं म्हटलं.
लियाम बॅगनॉल यानं ट्विटरवर डिलिव्हरी बॉयसोबत घडलेल्या संवादाचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. लियाम याच्या ट्विटला आतापर्यंत १ लाख ८० हजाराहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर हजारो युझर्सनं यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे.
Deliveroo नंही ग्राहकाच्या ट्विटवर रिप्लाय दिला आहे. "तुमच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. रायडर ऑपरेशन्स टीम याची माहिती घेत आहे. कृपया संपूर्ण घटनेची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आमच्यासोबत शेअर करा", असं कंपनीनं म्हटलं आहे. तसंच घडलेल्या घटनेबाबत माफी देखील मागितली आहे.