"आता माझी वेळ आहे तुला साथ देण्याची"; आईला पुन्हा संसार थाटताना पाहून लेक झाली भावूक; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 14:45 IST2026-03-09T14:43:43+5:302026-03-09T14:45:06+5:30
आईच्या दुसऱ्या लग्नाचा व्हिडिओ शेअर करत लेकीने दिली लग्नाच्या वाढदिवसाची खास भेट

"आता माझी वेळ आहे तुला साथ देण्याची"; आईला पुन्हा संसार थाटताना पाहून लेक झाली भावूक; व्हिडिओ व्हायरल
Social Viral: एका लग्नाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. पूजा भटनागर नावाच्या एका तरुणीने आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नाचा आणि त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. एका सिंगल मदरचा संघर्ष आणि त्यानंतर तिला मिळालेला जोडीदार पाहून नेटकरी भावूक झाले आहेत.
आईला तिचं खरं प्रेम मिळालं; लेकीची पोस्ट व्हायरल
पूजा भटनागरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओवर 'POV- जेव्हा तुम्ही तुमच्या आईला तिच्या सोलमेटसोबत लग्न करताना पाहता' असा मजकूर लिहिला आहे. यात तिची आई लाल रंगाच्या पारंपरिक साडीत नवरी म्हणून नटलेली दिसत आहे, तर तिचे नवे बाबा देखील अतिशय आनंदी दिसत आहेत.
पूजा आपल्या पोस्टमध्ये म्हणते, "त्या दिवशी मी आनंदाने किती रडत होते हे कोणालाच समजणार नाही. माझ्या आईला लग्न करताना पाहणं हे माझ्यासाठी भाग्याचं होतं. अखेर खऱ्या प्रेमाचा विजय झाला."
सिंगल मदरचा कठीण प्रवास आणि लेकीची साथ
पूजाच्या आईने तिला एकट्याने वाढवले आहे. अनेक वर्षांचा संघर्ष आणि एकाकीपणानंतर आईला पुन्हा एकदा सुखी संसारात पाहणे हे पूजासाठी स्वप्नवत होते. गेल्या वर्षी २०२५ मध्ये हे लग्न पार पडले होते. आता लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त पूजाने ही आठवण पुन्हा ताजी केली आहे. तिने एका व्हिडिओत असेही म्हटले की, "आईने मला हिंमतीने वाढवले, आता तिला पाठिंबा देण्याची आणि तिच्या आनंदासाठी उभे राहण्याची माझी वेळ आहे."
नेटकऱ्यांचा प्रतिसाद
या व्हिडिओला आतापर्यंत २० लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ९४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोक या माय-लेकीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले, कलेक्टिव्ह हीलिंग असं म्हटलं. तर दुसऱ्याने एका युजरने न्यू पापा इज सो क्यूट असं म्हटलं. अनेकांनी याला 'लव्हली फॅमिली म्हणत नजर न लागो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. समाजात आजही आईच्या दुसऱ्या लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित असताना, पूजाने आपल्या आईच्या सुखासाठी घेतलेला हा पुढाकार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.