कराडच्या विदेशी जावयासाठी वधूचा 'देशी स्टाईल' उखाणा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 19:14 IST2025-12-16T19:13:18+5:302025-12-16T19:14:11+5:30
सातारा : लग्न सोहळ्यात वधू - वराकडून उखाणे घेण्याची परंपरा आजही जपली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या एक विवाह ...

कराडच्या विदेशी जावयासाठी वधूचा 'देशी स्टाईल' उखाणा !
सातारा : लग्न सोहळ्यात वधू - वराकडून उखाणे घेण्याची परंपरा आजही जपली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या एक विवाह सोहळ्यातही एका वधूने आपल्या विदेशी पतीसाठी घेतलेला खास आणि खुसखुशीत उखाणा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या उखाण्याने पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड तर दिलीच, शिवाय कराडच्या जावयाला ‘सातारी ठसका’ही दाखवून दिला.
हा लग्न सोहळा नेमका कुठे व कधी पार पडला? याचा उल्लेख व्हायरल व्हिडिओत नाही, मात्र कराडच्या जावयासाठी उखाणा घेत असल्याचे कॅप्शन मात्र देण्यात आले आहे. व्हिडिओतील त्या जावयाचे नाव ‘टॅरन’ असून, या ‘विदेशी’ नवऱ्याला वधूने ‘देशी’ उखाण्यात गुंफले. वधूच्या या अनोख्या सादरीकरणाने हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. या उखाण्याला वऱ्हाडी मंडळींनी भरभरून दाद दिली. वधूची विनोदी अंदाजात उखाणा घेण्याची पद्धत कॅमेऱ्यात कैद झाली आणि पाहता-पाहता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
वधूने सादर केलेला उखाणा असा..
‘उखाणा म्हणजे काय, That I know
भारतात आला हा, Even my mom said no
इथे येऊन याने, जिंकले सर्वांचे मन
कराडचे बनले जावई, माझे पती परमेश्वर टॅरन !’
कमेंटचा पाऊस...
उखाण्याचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मनोरंजनाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. नेटकऱ्यांनी या जोडप्याला शुभेच्छा देत आणि वधूच्या अनोख्या उखाण्याचं कौतुक करत कमेंट्सचा पाऊस पाडला. कराडच्या जावयासाठी घेतलेला हा उखाणा सोशल मीडियावर हिट झाला असून, उखाण्याची ही पद्धत अनेकांच्या पसंतीसही उतरली.