Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 21:15 IST2025-05-20T21:13:45+5:302025-05-20T21:15:22+5:30
Bihar Temple Theft News: चोरीची संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
दिवसेंदिवस चोरांचे धाडस वाढत चालले असून आता चोर मंदिरातही चोरी करू लागले आहे. नवादा जिल्ह्यातील नगर पोलीस स्टेशन परिसरातील स्टेडियम रोडवरील गोवर्धन मंदिरात असाच एक प्रकार घडला. मंगळवारी पहाटे एका चोराने मंदिरातील दानपेटी चोरून नेली. दरम्यान, सकाळी मंदिरातील पुजारी आणि कर्मचारी मंदिरात आले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
चोरीच्या घटनेनंतर मंदिरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता मंगळवारी रात्री १ वाजताच्या सुमारास एक व्यक्ती मंदिरात प्रवेश करताना दिसला. मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्याने प्रथम देवी-देवतांना नमस्कार केला. त्यानंतर मंदिरातील दानपेटी उचलून नेली. १:२० च्या सुमारास तो तरुण दक्षिण गेटमधून बाहेर पडला.
स्थानिकांमध्ये संताप
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. मंदिरात चोरी झाल्याची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली. या घटनेवर संताप व्यक्त केला जात असून चोराला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी मंदिरात चोरी केल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. तर, काही जणांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.