Viral Video : सोशल मीडियावरील एका व्हिडीओने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले. एक कॉलेज तरुणी रिक्षाचालकाला मारहाण करताना आणि रिक्षातून बाहेर ओढताना दिसत आहे. हा व्हिडीओ आहे उत्तर प्रदेशातील मिर्झापूरचा! रिक्षाचालक आणि तरुणीमध्ये वाद होण्याचे मूळ कारण भाडे असल्याचे समोर आले आहे. याबद्दल रिक्षाचालक आणि तरुणीने एकमेकांविरोधात वेगवेगळे आरोप केले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या व्हिडीओत जी तरुणी रिक्षाचालकाला बाहेर ओढताना आणि मारहाण करताना दिसत आहे, तिचे नाव आहे प्रियांशी पांडेय. रिक्षाचालकाचे नाव आहे विमलेश कुमार शुक्ला. प्रियांशी रिक्षाचालकाला यांना शिवीगाळ करून रिक्षातून बाहेर खेचत आहे. रिक्षाचालक तिला हात जोडून विनंती करत असून तरूणी त्याला रिक्षातून बाहेर ढकलते.
इन्स्टाग्रामवर पोस्ट केला व्हिडीओ
घटनेचा हा व्हिडीओ प्रियांशीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिक्षाचालकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तरुणीविरोधात तक्रार दिली. मला न्याय द्यावा अशी मागणीही पोलिसांकडे केली.
दोघांनीही एकमेकांविरोधात वेगवेगळे आरोप केले आहेत. रिक्षाचालक शुक्लांनी म्हटले आहे की, "मी त्यांना सोडलं आणि पैसे मागितले. त्यांनी आम्ही विद्यार्थी आहोत, असे सांगत भाड्याचे पैसे देण्यास नकार दिला. तरीही मी त्यांना पैसे द्या असे म्हणत राहिलो. त्यानंतर एका तरुणीने माझी कॉलर पकडली आणि तिचा मोबाईल तिच्या बहिणीकडे दिला. तिने रेकॉर्डिंग करायला सांगितली. त्यानंतर मी म्हणालो की, मला पैसे नका देऊ. मी त्यांना धक्का लावला नाही."
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ बघून मला अपमानित झाल्यासारखं वाटत आहे. "त्यांनी व्हिडीओ बनवला आणि इन्स्टाग्रामवर टाकून मला बदनाम केलं. मला खूप अपमानित झाल्यासारखं वाटतं असून, भीकही मागू शकत नाही. या घटनेत मला जखमाही झाल्या आहेत. मला न्याय द्या", असे या चालकाने पोलिसांना सांगितले.
तरुणीचे म्हणणे काय?
प्रियांशी पांडेय या तरुणीने एका व्हिडीओतून या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. 'रिक्षाचालकाने अर्वाच्य भाषा वापरली. त्यामुळे त्याला बाहेर ओढले. त्यानंतर धमकीचे कॉल आले. त्यानंतर मी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला.'
दरम्यान, मिर्झापूर पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू करण्यात आला आहे.
प्रियांशी पांडेय या तरुणीने सोशल मीडियावर शेकडो पोस्ट आणि व्हिडीओ शेअर केलेले आहेत. यात तिने पिस्तुल घेऊनही काही रिल्स केल्या आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर २८ हजार फॉलोअर्स आहेत.