क्रिकेटप्रेमी नवरदेवाचा हटके उखाणा, पत्नीला थेट दिला इशारा, म्हणतो, 'क्रिकेट कधीच नाही सोडणार...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 13:42 IST2024-04-25T13:39:15+5:302024-04-25T13:42:30+5:30
सध्या सोशल मीडियावर एका क्रिकेटप्रेमी नवरदेवाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.

क्रिकेटप्रेमी नवरदेवाचा हटके उखाणा, पत्नीला थेट दिला इशारा, म्हणतो, 'क्रिकेट कधीच नाही सोडणार...'
Social viral : आपल्याकडे उखाण्याला विशेष महत्व असतं. एखाद्या लग्नकार्यात किंवा लग्न झालेल्या जोडप्यांना आवर्जून उखाणे घ्यायला लावले जातात. काही जण तर जुणे उखाणेच बोलतात तर काही जण एखादा हटके उखाणा बोलून त्यात आपल्या साथीदाराचे नाव घालतात. प्रसंगानुरुप उखाणे तयार करण्याचे काही जणांकडे खास स्कील असते. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतात. असाच एका क्रिकेटप्रेमी नवरदेवाचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.
पूर्वीच्या काळामध्ये अगदी भलेमोठे उखाणे घेतले जायचे. सध्याची तरूणाईची आपल्या जीवनशैलीशी संबंधित असणाऱ्या उखाण्यांना पसंती असते. या व्हायरल व्हिडिओमध्ये नवरदेवाने चक्क लग्नानंतर क्रिकेट सोडणार नाही, असं उखाण्याच्या माध्यमातून स्पष्टपणे आपल्या बायकोला सांगितलंय. त्यामुळे लग्न सोहळ्यात उपस्थित असलेली वऱ्हाडी मंडळी लोटपोट हसू लागली. नवरदेवाच्या या अनोख्या उखाण्याने अनेकांच लक्ष वेधलं आहे. sksagar3636 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.
हा व्हिडीओ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथील असून, नवरदेवाचं नाव पीयूष परब असं आहे. मूळचा मातोंड गावातील असलेला पियूष हा पेशाने इंजिनियर असून, स्थानिक क्रिकेटमध्ये अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध आहे.
या व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळतेय. जवळपास १ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केलाय. 'वाईच थांब... क्रिकेटच काय सगळाच सोडतलय तुला' अशी मजेशीर कमेंट एका यूजरने केलेली पाहायला मिळतेय. तर आणखी एक जणाने म्हटलंय, 'वहिनी लाईक... थांब जरा, थोडे दिवस मग दाखवते तुका क्रिकेट' अशी प्रतिक्रिया त्याने केली आहे.