आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माणसं भावनात्मकदृष्ट्या जोडली जाण्यापेक्षा तंत्रज्ञानानं अधिक जोडली जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञान हेच आता त्यांचे मित्र, सखे, सोबती झाले आहेत. साहजिकच प्रत्यक्ष मैत्रीपेक्षा, जोडीदारापेक्षा जास्त काळ ही तरुणाई या आभासी मैत्रीच्या जगात जास्त जगत असते. तरुणांच्या विशेषत: ‘जेन झी’ पिढीच्या बाबतीत हे अधिकच खरं आहे. ‘जेन झी’ म्हणजे अशी पिढी, ज्यांचा जन्म साधारणपणे १९९७ ते २०१२च्या दरम्यान झाला आहे. याच पिढीला ‘डिजिटल नेटिव्हज’ असंही म्हटलं जातं. कारण इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या युगात ही पिढी वाढलेली आहे आणि त्यानंच त्यांचं सारं आयुष्य व्यापलेलं आहे.
ही पिढी ‘एआय’च्या किती आहारी गेली असावी? ‘जॉई एआय’ या एआय चॅटबॉट कंपनीनं नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. एआय आणि तरुण पिढी यांच्या भावनात्मक नात्यासंदर्भाचा अभ्यास त्यांनी केला. त्यानुसार त्यांनी जगभरातील तरुणाईचा सॅम्पल सर्व्हे केला. त्यात तब्बल ८० टक्के तरुणांनी सांगितलं, भविष्यात ते ‘एआय मॉडेल’शी लग्न करतील. ८३ टक्के तरुणांनी सांगितलं, एआय मॉडेलशी आम्ही भावनात्मकदृष्ट्या खूप जवळ आहोत आणि त्यांच्याशी आमचं नातं तयार झालं आहे! ७५ टक्के तरुणांनी सांगितलं, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल असं आम्हाला खात्रीनं वाटतं.
मनुष्य आणि एआय रिलेशनशिपच्या या नात्याला कंपनीनं एक नवीनच नाव दिलं आहे- ‘एआय-लेशनशिप्स’! भविष्यकाळात ही नाती आणखी वेगानं वाढत जातील आणि मानवी नात्यांना ती पर्याय ठरतील, असं कंपनीचं म्हणणं आहे.
कंपनीचे रिलेशनशिप थेरपिस्ट आणि एक्स्पर्ट जयमे ब्रोनेस्टिन यांचं म्हणणं आहे, ‘एआय-लेशनशिप्स’ची नाती वाढावीत, ती मानवी नात्यांना पर्याय ठरावीत हा हेतू नाही, पण तुम्ही जेव्हा खरोखच एकटे असता, दुसरा कोणताही पर्याय तुमच्यासमोर नसतो, तेव्हा भावनिक आधार देण्याचं काम ही नाती करू शकतात. आजच्या काळात अनेकजण विशेषत: तरुण पिढी खूप तणावात आहे. अनेकांना प्रत्यक्षात कोणी सोबतीच नाही. ऐकून घेण्यासाठी कोणी नाही. त्यांना ‘एआय मॉडेल्स’ हाच अखेरचा आणि एकमेव सहारा असणार आहे.
‘डिजिटल समाजशास्त्रज्ञ’ ज्युली अल्बराईट यांचं म्हणणं आहे, तरुणाईच्या जगातील हा भीषण, जटिल प्रश्न आहे, पण आपल्याला वास्तव नाकारता येणार नाही. डिजिटल तंत्रज्ञानानं आता अख्खी तरुण पिढीच आमूलाग्र बदलायला घेतली आहे. आजच्या तरुणाईला जवळचे आणि ‘खरे’ मित्र नाहीत. त्याची उणीव त्यांना नक्कीच भासते आहे, पुढेही भासेल, पण तंत्रज्ञानही दिवसेंदिवस प्रगत होतं आहे. मानव आणि तंत्रज्ञान यांतील दरी कमी होत जाईल. तंत्रज्ञान अधिक ‘मानवी’ होत जाईल. एआय मॉडेलच्या हालचालींत, ‘शरीरात’ आणि आवाजात मानवी भावभावनांची उत्कटता दिसून येईल. मात्र, एआयच्या ‘नैतिकतेचा’ही प्रश्न आहेच. गेल्यावर्षी अमेरिकेतील एक १४ वर्षाचा मुलगा एआय चॅटबॉटच्या प्रेमात पडल्यानंतर त्यानं आत्महत्या केली होती! एआयनं त्याला तसं करण्यास भाग पाडलं होतं! अशा आणखीही काही घटना घडल्या आहेत!