UP Crime: उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात एका नामांकित ज्वेलरी शोरूममध्ये भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. चार महिलांनी ग्राहकाच्या वेशात येऊन अवघ्या १४ मिनिटांत तब्बल १४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या चोरीचे सर्वात धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे, या महिलांनी स्वतःसोबत लहान मुलांना आणले होते, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. पण हा सगळा प्रकार दुकानातल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
प्रयागराजमधील कल्याण ज्वेलर्स या शोरूममध्ये ३१ डिसेंबर रोजी ही घटना घडली. चार अज्ञात महिला शोरूममध्ये शिरल्या आणि त्यांनी दुकानदाराला सोन्याचे कानातले दाखवण्यास सांगितले. दुकानदार त्यांना विविध दागिने दाखवण्यात व्यस्त असताना, या महिलांनी आपल्या बोलण्याने त्याला पूर्णपणे गुंतवून ठेवले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या दृश्यांनुसार, जेव्हा दुकानदार काउंटरवरून थोड्या वेळासाठी बाजूला झाला, तेव्हा एका महिलेने अत्यंत सफाईने डिस्प्ले पॅडवरील सोन्याच्या दागिन्यांचा ट्रे उचलली. तिने तो ट्रे बाजूला बसलेल्या दुसऱ्या महिलेकडे सरकवला. तिने क्षणाचाही विलंब न लावता दागिने आपल्या अंगावरील शालीत लपवले. ही सर्व चोरी इतकी वेगवान आणि प्रोफेशनल पद्धतीची होती की बाजूला बसलेल्या इतर ग्राहकांना किंवा सुरक्षारक्षकांना याची साधी कुणकुणही लागली नाही.
स्टॉक तपासताना फुटला घाम
चोरी केल्यानंतर या महिला लहान मुलांसह आरामात शोरूमबाहेर पडल्या. काही वेळाने जेव्हा शोरूममधील कर्मचाऱ्यांनी साठ्याची तपासणी केली, तेव्हा सोन्याचे काही झुमके गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, या चार महिलांनी केलेल्या चोरीचा खुलासा झाला.
याप्रकरणी शोरूम व्यवस्थापकाने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी राम आश्रय यादव यांनी सांगितले की, "आम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलांचा शोध घेत आहोत. शोरूमबाहेरील आणि रस्त्यांवरील कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून महिलांनी पळून जाण्यासाठी कोणता मार्ग वापरला, याचा शोध सुरू आहे."
Web Summary : In Prayagraj, four women stole ₹14 lakh worth of gold jewelry from Kalyan Jewellers in just 14 minutes. Posing as customers with children, they distracted staff and swiftly concealed the loot. Police are investigating the CCTV footage.
Web Summary : प्रयागराज में कल्याण ज्वेलर्स से चार महिलाओं ने 14 मिनट में 14 लाख रुपये के सोने के गहने चुरा लिए। बच्चों के साथ ग्राहक बनकर आईं, कर्मचारियों को विचलित किया और तेजी से माल छिपा लिया। पुलिस सीसीटीवी फुटेज की जांच कर रही है।