रोजंदारीवर कार्यरत ९ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने केले कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 18:35 IST2021-06-24T18:34:24+5:302021-06-24T18:35:38+5:30
Zp Sindhudurg : गेली अनेक वर्षे रोजंदारीवर कार्यरत असलेल्या नऊ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने कायम केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले आहे. या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. (छाया : मनोज वारंग)
सिंधुदुर्ग : गेली अनेक वर्षे रोजंदारीवर कार्यरत असलेल्या नऊ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने कायम केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले आहे. या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडे रोजंदारीवर कार्यरत असलेल्या ९ कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत १६ डिसेंबर २०१९ रोजी ठराव घेऊन तसा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडून शासनस्तरावर प्रस्ताव सादर केला होता. यावर निर्णय होऊन जिल्हा परिषदेच्या देखभाल-दुरुस्तीमधून यासाठी ९० लाख तेवढी तरतूद केली आहे. अशाप्रकारे रोजंदारी कर्मचारी यांचा शासकीय सेवेतील कामाचा विचार करून त्यांना नियमित केल्याने खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाचे चीज झाल्याचे या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
यावेळी कृष्णा शंकर निंबाळकर, प्रदीप एकनाथ वाडेकर, बाळकृष्ण रामचंद्र सावंत, आनंद बाबी शिरोडकर, दत्ताराम राजाराम सरमळकर, चंद्रकांत भिवा सावंत, अशोक धोंडू लाड, विकास वासुदेव घाडीगावकर, दीपक हरी काडगे या रोजंदारी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत कायम करत असल्याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास सभापती गावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजेंद्र पराडकर, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे व कर्मचारी उपस्थित होते.
संजना सावंत यांच्या प्रयत्नांना यश
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदअंतर्गत १९८६ सालापासून आम्ही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या यांत्रिकीकरण विभागात रोजंदारीवर काम केले आहे. पण शासनाकडे पाठपुरावा करून आम्हांला कायम करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत आज रुजू करण्यात आले. त्यामुळे सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांचे आभार व्यक्त केले.