Sindhudurg News: धक्कादायक! क्रिकेट खेळताना चक्कर येऊन पडल्याने मडूरेत तरुणाचा मृत्यू
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 29, 2023 12:20 IST2023-05-29T12:20:07+5:302023-05-29T12:20:59+5:30
काही दिवसांपूर्वीच ते कुटुंबियांसमवेत सुट्टीला मडुरा गावी आले होते

Sindhudurg News: धक्कादायक! क्रिकेट खेळताना चक्कर येऊन पडल्याने मडूरेत तरुणाचा मृत्यू
बांदा (सिंधुदुर्ग) : क्रिकेट खेळताना चक्कर येऊन पडल्याने मडूरेत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन दिगंबर गावडे (४४, रा. मडुरा भरडवाडी) असे त्यांचे नाव आहे. ते नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास असून काही दिवसांपूर्वीच ते कुटुंबियांसमवेत सुट्टीत मडुरा गावी आले होते.
रविवारी सायंकाळी ते घरातील लहान मुलांसोबत साई मंदिर परिसरात गेले होते. क्रिकेट खेळत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्याच ठिकाणी ते खाली कोसळले. माजी ग्रा. पं. सदस्य सखाराम परब यांनी त्यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्यांचा तत्पूर्वीच मृत्यू झाला. त्यांच्या अकाली जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
गेले काही दिवस प्रचंड उष्णता वाढली असून उष्माघातासारखा प्रकार जाणवत आहे. यामुळे पाऊस पडेपर्यंत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.