सफाई कामगारांचे ओरोसमध्ये काम बंद आंदोलन
By Admin | Updated: February 27, 2015 23:21 IST2015-02-27T22:45:36+5:302015-02-27T23:21:32+5:30
विविध मागण्या : आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

सफाई कामगारांचे ओरोसमध्ये काम बंद आंदोलन
सिंधुदुर्गनगरी : गेले चार महिन्याचे थकीत वेतन तत्काळ द्या, रिक्त जागा भरताना कंत्राटी सफाई कामगारांना प्राधान्याने सामावून घ्या. किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करा. भविष्यनिर्वाह निधीचा लाभ घ्या. आदी प्रमुख मागण्यासाठी शुक्रवारी जिल्हा रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालयातील सफाई कामगारांनी जिल्हा रूग्णालय ओरोस येथे कामबंद ठेवून धरणे आंदोलन छेडले.
जिल्हा रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालयातील कंत्राटी सफाई कामगार गेले चार महिने वेतनापासून वंचित आहेत. याकडे जिल्हा रूग्णालय प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे. संबंधित कंत्राटदार या कामगारांशी बोलणे टाळत आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांना लेखी पत्र देवूनही त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. ते कंत्राटदाराकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहेत. यासाठी आज रूग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांनी कमलताई परूळेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रूग्णालयासमोर कामबंद ठेवून धरणे आंदोलन छेडले.या आंदोलनात जिल्हाभरातील सुमारे ६0 सफाई कामगार सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्या सफाई कामगारांची जिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश नलावडे यांनी भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी झालेल्या चर्चेत कमलताई परूळेकर त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांची चूक लक्षात आणून दिली.
शासनाने या कामगारांना किमान वेतन देणे बंधनकारक केले आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येकी १0,४६१ रूपये एवढे वेतन देणे अपेक्षित आहे. तसेच ५ तारीखपूर्वी दरमहा पगार दिल्याची रिसीट जिल्हा शल्य चिकित्सकांकडे देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, तशाप्रकारे पावत्या दिल्या जात नाहीत. त्याकडे जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, ही बाब गंभीर आहे. निविदा मंजूर करताना घालण्यात आलेल्या अटी शर्थीचे संबंधित ठेकेदाराकडून पालन केले जात नाही. शासनाचे अनुदान प्राप्त झाले नसले तरी संबंधित ठेकेदाराने कामगारांचा पगार वेळेत देणे बंधनकारक आहे. त्याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात जेवढे जिल्हा रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालयामध्ये कंत्राटी सफाई कामगार आहेत. त्याहून कितीतरीपटीने चतुर्थ श्रेणीच्या रिक्त जागा आहेत. सुमारे ६0 सफाई कामगार कंत्राटी पद्धतीने गेली दहा वर्षे काम करीत आहेत. ते सहज रिक्त जागांवर भरले जाऊ शकतात. मात्र, जिल्हा प्रशासनाने ही पदे भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कंत्राटी सफाई कामगारांना वॉर्डमध्ये नियमीत कर्मचाऱ्यांप्रमाणे रात्रंदिवस राबवून घेतले जाते. तो पगार जातो कुठे? असा प्रश्नही परूळेकर यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)