किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी कामास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 09:36 IST2024-12-26T09:35:45+5:302024-12-26T09:36:19+5:30
कामाची खोदाई सुरू : कामाच्या ठिकाणी सापडला कठीण खडक

किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी कामास सुरुवात
मालवण : मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. या कामाच्या फाउंडेशनची खोदाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, खोदाईच्या कामात कठीण खडक सापडल्यामुळे कामाचा वेग मंदावत असल्याचे सांगण्यात आले. राज्य सरकारने याठिकाणी ६० फूट उंच पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. देशभरात मोठमोठे पुतळे दर्जेदार पद्धतीने उभारण्याचा मोठा अनुभव त्यांना आहे.
राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. इतर निविदाची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. आधी ३ फूट उंचीचे फायबर मॉडेल तयार केले जाईल. कला संचालनालयाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम हाती घेतली जाईल. नव्या पुतळ्याचा प्रकल्प आयआयटी- मुंबई आणि अनुभवी कंत्राटदार कंपनीला देण्यात आले आहे. तसेच पुतळा मजबूत असा उभारला जावा, यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येणार आहे.
६० फूट उंच, ३ मीटरचा चौथरा
कांस्य धातूपासून ६० फूट उंचीचा ८ मिलिमीटर जाडीचा पुतळा तयार होत आहे. डोक्यापासून पायापर्यंत पुतळ्याची उंची ६० फूट इतकी असणार आहे. तर पुतळा ज्यावर उभा असेल तो ३ मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनविण्यात येणार आहे. निविदेनुसार १०० वर्षे टिकेल, असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे. तर १० वर्षे पुतळ्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचीही अट घालण्यात आली आहे.
खोदाईचे काम बारकाईने, सावधगिरीने
पूर्वी पेक्षा मजबूत आणि उंच पुतळा उभारण्यात येणार असल्यामुळे फाउंडेशनच्या खोदाईचे काम बारकाईने आणि सावधरीतीने केले जात आहे. दरम्यान, या खोदाईत कठीण खडक सापडल्यामुळे खोडाईच्या कामाला विलंब हित आहे. कठीण खडक यंत्राच्या सहाय्याने फोडल्या नंतरच कामाला गती येईल, असे तंत्रज्ञांनी सांगितले.