मांडवी एक्स्प्रेसखाली उडी घेत महिलेची आत्महत्या, कणकवली रेल्वे स्टेशन नजीक घडली घटना
By सुधीर राणे | Updated: November 11, 2023 16:23 IST2023-11-11T16:23:32+5:302023-11-11T16:23:48+5:30
कणकवली: गोव्याहून मुंबईच्या दिशेने मांडवी एक्सप्रेस जात असताना कणकवली येथे रेल्वे रुळावर स्वतःला झोकून देत एका महिलेने आत्महत्या केली. ...

मांडवी एक्स्प्रेसखाली उडी घेत महिलेची आत्महत्या, कणकवली रेल्वे स्टेशन नजीक घडली घटना
कणकवली: गोव्याहून मुंबईच्या दिशेने मांडवी एक्सप्रेस जात असताना कणकवली येथे रेल्वे रुळावर स्वतःला झोकून देत एका महिलेने आत्महत्या केली. ही घटना आज, शनिवारी सकाळी कणकवली रेल्वे स्टेशन नजीक घडली. त्यामुळे ती रेल्वे गाडी सुमारे अर्धा तास स्थानकातच थांबून होती.
गोव्याहून मुंबईच्या दिशेने मांडवी एक्स्प्रेस जात होती. शनिवारी सकाळी ११.४८ वाजण्याच्या सुमारास ही रेल्वे कणकवली स्टेशनवर आली. त्याचवेळी तेथे उभे असलेल्या अंदाजे ५२ वर्षीय महिलेने प्लॅटफॉर्म समोरच रुळावर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. त्यामुळे गाडी अंगावरून गेल्याने त्या महिलेच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती.
घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक राजेश सुरवाडे, विनोद पाटील, युवराज पाटील, गणेश खांदरे, विपुल मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस उपनिरीक्षक शरद देठे, पोलिस नाईक रुपेश गुरव, चंद्रकांत माने, मकरंद माने आदी घटनास्थळी दाखल झाले. त्या महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु असून तीने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले हे समूज शकलेले नाही. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.