CoronaVirus : कोरोना चाचणी प्रयोगशाळेची तयारी अजून का नाही? : नीतेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 18:00 IST2020-05-28T17:55:21+5:302020-05-28T18:00:41+5:30
सिंधुदुर्गवासीयांच्या आयुष्याची खेळू नका. ही प्रयोगशाळा सुरू व्हायला जेवढा उशीर होईल, तेवढा मोठा धोका जिल्हा प्रशासन पत्करत आहे. जिल्ह्यातील जनता कोरोनारूपी टाईम बॉम्बवर बसली आहे. हा बॉम्ब कधीही फुटू शकतो. याचे भान ठेवा, असा सल्ला आमदार नीतेश राणे यांनी दिला आहे.

CoronaVirus : कोरोना चाचणी प्रयोगशाळेची तयारी अजून का नाही? : नीतेश राणे
कणकवली : सिंधुदुर्गवासीयांच्या आयुष्याची खेळू नका. ही प्रयोगशाळा सुरू व्हायला जेवढा उशीर होईल, तेवढा मोठा धोका जिल्हा प्रशासन पत्करत आहे. जिल्ह्यातील जनता कोरोनारूपी टाईम बॉम्बवर बसली आहे. हा बॉम्ब कधीही फुटू शकतो. याचे भान ठेवा, असा सल्ला आमदार नीतेश राणे यांनी दिला आहे.
जिल्ह्यात येणाऱ्या सर्वांचे स्वॅब नमुने घेतले जात नसल्याने सिंधुदुर्गात कोरोना प्रादुर्भावाचा मोठा धोका आहे. त्यामुळे तातडीने जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करावी. पडवे मेडिकल कॉलेजमध्ये ही प्रयोगशाळा सुरू करायची नसेल तर करू नका, असे राणे म्हणाले.
ओसरगांव महिला भवन येथे ते बोलत होते. यावेळी राणे पुढे म्हणाले, मुंबईहून जिल्ह्यात आलेले चाकरमानी थेट घरी किंवा शाळांमध्ये क्वारंटाईन होत आहेत. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी दिवसा शिक्षक आहेत. पण रात्री त्यांच्यावर देखरेख करणारी यंत्रणा उपलब्ध नाही.
एवढेच नव्हे तर या चाकरमान्यांचे स्वॅब नमुने घेतले जात नाहीत. ज्यांचे नमुने घेतले त्यांचे अहवाल उशिरा उपलब्ध होतात. काहींचे अहवाल चुकीचे पाठविले जात आहेत. यामुळे सिंधुदुर्गात कोरोनाचा प्रादुर्भाव किती झाला याबाबतची नेमकी आकडेवारीच समोर येत नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढील काळात कोरोना संसर्गाचा मोठा धोका आहे.
सिंधुदुर्गात मिळणारे कोरोनाचे अहवाल खरे की खोटे? कोरोना अहवाल मिळायला तीन-चार दिवस लागतात. त्याचप्रमाणे ज्यांचे चाचणी अहवाल अजून आलेले नाहीत त्यांना कोरोनाच्या रुग्णांसमवेत क्वारंटाईन राहण्याची वेळ आलेली आहे. प्रशासन या सर्वांवर अन्याय करीत आहे.
चाकरमानी आमचेच आहेत. त्यांचे घर, गाव येथे आहे. ते आपल्या गावी येणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र, त्यांना येथे आणण्यापूर्वी त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था सरकारने करायला नको काय? संस्थात्मक व होम क्वारंटाईन केलेले गावभर फिरत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण कसे आणणार? शाळांमध्ये सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत शिक्षकांना कामाला लावले आहे.
त्यानंतर क्वारंटाईन व्यक्तीवर देखरेख कोणाची आहे? कोरोना अहवाल बदलला आणि तो लीक झाला त्याची चौकशी करण्यापेक्षा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह आणि निगेटिव्हचा पॉझिटिव्ह अहवाल कसा होतो याची चौकशी करा व माझे म्हणणे चुकीचे असल्याचे सिद्ध करा.
राणेंच्या मेडिकल कॉलेजची अॅलर्जी तुम्हांला असेल तर अन्य कुठेही प्रयोगशाळा सुरू करा. मात्र, जिल्ह्यात जनतेला सेवा द्या. आमदार वैभव नाईक यांच्या कॉलेजमध्ये किंवा आमदार दीपक केसरकर सुचवित असतील तर त्यांची जागा घ्या. मी आमच्या मेडिकल कॉलेजमधील मायक्रोबायोलॉजिस्ट व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना तेथे पाठवतो. मात्र स्वॅब चाचणी सुरू करा.
केरळमधील डॉक्टरांना २० लाखांचे पॅकेज दिले जाते. मात्र, महाराष्ट्रात डॉक्टरांची पगार कपात होते हे दुर्दैव आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी ग्रामपंचायतींना काय दिले आहे? सरपंच स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून सेवा देत आहेत. त्यांना १० लाखांचा निधी सरकारने देणे गरजेचे आहे. सिंधुदुर्गसाठी केवळ ३० टक्के विकासनिधी आला आहे. यातील २५ टक्के निधी कोविडसाठी वापरायचा आहे. शिल्लक ५ टक्के निधीत जिल्ह्याचा विकास कसा करणार? असा सवालही यावेळी राणे यांनी उपस्थित केला.
लहान मुलांच्या जीवाशी खेळणार काय?
१५ जूनपासून शाळा सुरू करायच्या असे शिक्षणमंत्री म्हणतात. त्यांना शाळांची स्थिती माहीत आहे काय? शाळांमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन करून ठेवलेले लोक आहेत. अजूनही लोक येत आहेत. मग या शाळांमध्ये मुलांना कसे पाठवायचे? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. लहान मुलांच्या आरोग्याची काळजी कोणालाच नाही. शाळा सुरू करून त्यांच्या जीवाशी खेळणार काय? असा सवालही आमदार नीतेश राणे यांनी केला.