धूमस्वारांच्या वेगाची ‘नशा’ रोखणार कोण?
By Admin | Updated: October 29, 2015 00:10 IST2015-10-28T22:12:09+5:302015-10-29T00:10:48+5:30
पोलिसांकडून कारवाई आवश्यक : पालकांचे दुर्लक्ष; वाहतूक नियमांबाबत जनजागृती होणे गरजेचे

धूमस्वारांच्या वेगाची ‘नशा’ रोखणार कोण?
सिद्धेश आचरेकर --- मालवण -आजकाल तरुणाईला वाहनांचे आकर्षण असल्याने महाविद्यालयीन धूमस्वारांची संख्या वाढत आहे. ‘चंगळवादा’च्या विळख्यात सापडलेले हे तरुण बाईक्सचा रस्त्यांवर बेदरकारपणे वापर करून लाखमोलाचे जीव काही तासांत संपवत आहेत. त्यामुळे धूमस्वारांच्या वेगाच्या नशेला आवर घालणार तरी कोण? वाहतूक पोलीस कारवाई करतात खरे, पण पुन्हा हे धूमस्वार ‘पालथ्या घड्यावर पाणी’ या उक्तीप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. परिणामी, काहींना जीव गमवावा लागलाय, तर काहींनी कायमचे अपंगत्व स्वीकारले आहे.
तरुणाईच्या बाईक्सच्या वेगाच्या व्यसनाला वाहतूक पोलीसच आळा घालू शकतात. पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना त्यांच्या चुकीची अद्दल घडविली पाहिजे. आज विशेषत: तरुण चंगळवादात भरकटत चालला आहे. पालकांचे दुर्लक्ष होत आहे. मुलांच्या मागणीनुसार पालक त्यांना महागडे मोबाईल, महागड्या गाड्या घेऊन देतात. यात पालकांचा दोष आहे. दररोज एक-दोन अपघात घडत असतात. यात १८ ते ३५ याच वयोगटाची संख्या जास्त असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. आजतागायत तरुणांनी गंभीर अपघाताला स्वत:हूनच आमंत्रण देऊन लाखमोलाच्या जिवाची राखरांगोळी करून घेतली आहे. त्यामुळे आता समाजातील सुज्ञ नागरिकांनी धूमस्वारांविरोधी आवाज उठविला पाहिजे. पालकांनीही याकडे कानाडोळा न करता विशेष लक्ष घालून पाल्याच्या धूमस्टाईलची नशा उतरविण्याचा प्रयत्न करणे आजमितीस गरजेचे बनले आहे.
पोलिसांनी कडक धोरण अवलंबवावे
धूमस्वारांना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरते. वाहतूक पोलीस कायद्यातील तरतुदीप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करतात. मात्र, बऱ्याचदा असे होते की, पोलिसांनी दुचाकी तसेच अन्य वाहनांना कारवाईसाठी थांबविल्यावर तो चालक कोणा एका राजकीय पुढाऱ्याला फोन करतो. ट्रॅफिक पोलीस त्याच्याबरोबर संवाद साधतो आणि त्याला सोडून देतो. हे मुळात चुकीचे आहे. वाहतुकीच्या बाबतीत पोलीस प्रशासनाने कडक कारवाईचे धोरण अवलंबले पाहिजे. राजकीय पुढाऱ्यांना न जुमानता कायद्याप्रमाणे कारवाई केल्यास नक्कीच धूमस्वारांना आळा बसू शकेल.
पालकांनी जागरूक व्हावे
धावपळीच्या युगात पालक आणि पाल्यात समन्वयाचा अभाव दिसून येतो. पालक नोकरी, व्यवसायात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्यास तितकासा वेळ मिळत नाही. त्यात पाल्याच्या हरएक मागण्या- इच्छा पालक पुरवून मोकळे होतात. मात्र, त्याचे गंभीर परिणाम होणार याची कल्पना असतानाही याकडे दुर्लक्ष करून महागड्या गाड्या, बाइक्स पुरवतात. काही पालक पाल्यांना आॅफर देतात. दहावी उत्तीर्ण झाल्यावर तुला अमुक घेऊन देईन म्हटल्यावर मग त्याची वचनपूर्ती पालकांकडून होते. विद्यार्थी दहावीपासून दुचाकीवर आरूढ होतात. त्यामुळे पालकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन पाल्यांना शिस्तीचे धडे द्यावेत.
रस्त्यांची अवस्था अन् बाईक्स क्षमता
सध्या मालवण शहराचा विचार केला तर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यात महाविद्यालयीन विद्यार्थी अगदी बेदरकारपणे दुचाकी हाकत आहेत. शहरात ‘फास्ट’ ट्रॅक प्रकारातील जवळपास २० हून अधिक बाईक्स असतील. या बाईक्सची क्षमता ताशी १५० कि.मी. असते. मात्र, शहरातील रस्त्यांवर या बाईक्स १०० च्या वेगाने पळवून काय फायदा आहे? धूमस्वारांच्या वेगाच्या नशेचा काहीवेळा पादचाऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे हायस्पीड वाहने हाकणाऱ्यांना आपल्यापासून दुसऱ्यांना त्रास होता नये याची जाणीव त्यांना होणे गरजेचे आहे. नेहमी घडणाऱ्या अपघातांचा तरुणाईने बोध घेतल्यास अपघातांचे प्रमाणही कमी होईल, यात शंकाच नाही.