कणकवली: संजय राऊत यांनी अमली पदार्थ या विषयावर विनाकारण बोलू नये. अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता राज्यात होती. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा अमली पदार्थ रोखण्यासाठी त्यांनी काय केले? याची माहिती संजय राऊत यांनी द्यावी. त्यानंतरच आमच्या सरकारवर त्यांनी बोलावे असे भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊत यांना ठणकावले. कणकवली येथे आज, मंगळवारी प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. वर्षा बंगल्यावर सचिन वाझे यायचे त्याचे उत्तर कधी देणार ? राणे म्हणाले, कंगना राणावत यांनी महाराष्ट्र सदनमध्ये जाऊन राहण्यासाठी विचारपूस केली. त्यांना प्रशासनाने नाही म्हटले. त्या तेथून निघून गेल्या. यावर संजय राऊत यांना मिरच्या झोबल्या. कंगना या जनतेतून निवडून गेलेल्या खासदार आहेत. राऊत यांच्या सारख्या 'बँक डोअरने' खासदार झालेल्या नाहीत. त्यामुळे कंगना यांनी महाराष्ट्र सदनमध्ये राहायला मिळेल काय ? असे विचारले तर टीका करण्याचे कारण नाही. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर सचिन वाझे यायचे त्याचे उत्तर कधी देणार ? असा सवालही त्यांनी केला. गृहमंत्री सक्षम संजय राऊत हे दिल्लीत ज्या खासदार निवासस्थानी राहतात तिथे काय चालते ? हे आम्ही जगासमोर आणायचे का ? आमचे गृहमंत्री सक्षम आहेत. तुमच्या वसुली सरकारपेक्षा आमचे सरकार सक्षम आहे. त्यामुळे ड्रग्ज माफियांवर निश्चितच कडक कारवाई होईल.धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास आमचा विरोध धर्माच्या नावाने कोणाला आरक्षण मिळत नाही. विविध जाती आहेत त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. मुस्लिम धर्मात काही मागास जाती आहेत, त्यांना आरक्षण द्या आमची हरकत नाही. मात्र धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास आमचा विरोध राहील. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले जाईल. कुठल्याही दुसऱ्या समाजाचा एक टक्काही आरक्षण न हलवता आरक्षण मिळणार आहे. ओबीसी समाजाने घाबरण्याची गरज नाही. हिंदू समाजामध्ये जी फाटाफूट होत आहे, त्यामुळे नुकसान हिंदू धर्माचेच होत आहे. हिंदू धर्माच्या सुजान नागरिकांनी हा विचार करावा असे आवाहनही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केले.
ठाकरेंनी राज्यात सत्ता असताना अमली पदार्थ रोखण्यासाठी काय केले?, नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल
By सुधीर राणे | Updated: June 25, 2024 16:13 IST