सुमार मराठीवरून ट्रोल झालेल्या श्रद्धाराजे भोसले सावंतवाडीच्या नव्या नगराध्यक्षा; १३०० मतांनी विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 17:04 IST2025-12-21T16:52:15+5:302025-12-21T17:04:14+5:30
Sawantwadi Nagar Parishad Election Result 2025: सोशल मीडियावरील ट्रोलिंग, भाषेवरून झालेली टीका आणि विरोधकांचे तगडे आव्हान या सर्वांवर मात ...

सुमार मराठीवरून ट्रोल झालेल्या श्रद्धाराजे भोसले सावंतवाडीच्या नव्या नगराध्यक्षा; १३०० मतांनी विजयी
Sawantwadi Nagar Parishad Election Result 2025: सोशल मीडियावरील ट्रोलिंग, भाषेवरून झालेली टीका आणि विरोधकांचे तगडे आव्हान या सर्वांवर मात करत सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्यातील श्रद्धाराजे सावंत भोसले यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या श्रद्धाराजेंनी सुमारे १३०० मतांच्या मोठ्या फरकाने बाजी मारत सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदाची सुत्रे आपल्या हाती घेतली आहेत.
निवडणूक प्रचारादरम्यान श्रद्धाराजे भोसले यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. लंडन आणि अमेरिकेत शिक्षण झाल्यामुळे त्यांना मराठी बोलताना काहीसा अडथळा येत होता. त्यांच्या या अडखळत्या मराठीवरून सोशल मीडियावर त्यांची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली. मात्र, सावंतवाडीच्या मतदारांनी भाषेपेक्षा राजघराण्याने आजवर केलेल्या कामाला महत्त्व दिले आणि विरोधकांचे तगडे आव्हान असताना विजय मिळवला.
सावंतवाडीच्या या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. शिवसेनेचे (शिंदे गट) दीपक केसरकर यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र त्यांच्या उमेदवाराला यश मिळाले नाही. श्रद्धाराजे यांच्या विरोधात उबाठा गटाच्या सीमा मठकर, शिवसेनेच्या निता कविटकर आणि काँग्रेसच्या साक्षी वंजारी असे तगडे उमेदवार रिंगणात होते. मात्र, भाजपच्या जोरावर श्रद्धाराजेंनी सर्वांनाच मागे टाकले. पालकमंत्री नितेश राणे यांनीही या निवडणुकीत मोठी ताकद लावली होती.
उच्चशिक्षित नगराध्यक्षा
श्रद्धाराजे भोसले या सावंतवाडी संस्थानचे अखेरचे राजे श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या नातसून आहेत. त्यांचे पती लखमराजे भोसले हे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. मुंबईत जन्मलेल्या श्रद्धाराजे यांनी लंडन आणि अमेरिकेतून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. २०१९ मध्ये विवाहबंधनात अडकल्यानंतर त्या सावंतवाडीच्या सून झाल्या. त्या मुळच्या गुजरातच्या आहेत.
विजयानंतर माध्यमांशी बोलताना श्रद्धाराजे यांनी पुन्हा एकदा आपल्या ध्येयाचा पुनरुच्चार केला. "सावंतवाडीचा सर्वांगीण विकास करणे आणि या शहराला पुन्हा एकदा त्याचे ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देणे, हेच माझे उद्दिष्ट आहे," असे त्यांनी सांगितले.