विकास कुडाळकर शिवसेनेत, भाजपाला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 14:43 IST2020-07-28T14:40:37+5:302020-07-28T14:43:36+5:30
भाजपला सिंधुदुर्गात मोठा धक्का देण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. भाजप नेते खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी सोमवारी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संजय पडते, सतीश सावंत उपस्थित होते.
सिंधुदुर्ग : भाजपला सिंधुदुर्गात मोठा धक्का देण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. भाजप नेते खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी सोमवारी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वी विकास कुडाळकर यांची पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या घरी भेट घेत चर्चा केली होती. यावेळी विकास कुडाळकर यांचा खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश होणार असल्याचे निश्चित झाले होते. त्यानंतर कुडाळकर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला होता.
अखेर ओरोस येथील खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात विकास कुडाळकर यांनी खासदार राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला.
खासदार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या सोबत जिल्हाप्रमुख संजय पडते, गटनेते नागेंद्र परब यांच्या साथीने कुडाळ तालुक्यासह अन्य ठिकाणी शिवसेना संघटना वाढविण्यासाठी प्रामाणिक काम करणार असल्याचे कुडाळकर यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, रुची राऊत आदी उपस्थित होते.
लवकरच समर्थकांचा मेळावा घेणार
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताच समर्थक कार्यकर्त्यांचा प्रवेश कार्यक्रमसुद्धा घेण्यात येईल, असे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले. कुडाळकर हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपाच्या गोटात शांतता पसरली आहे. लवकरच तालुक्यातील आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचे नियोजन कुडाळकर यांनी केले आहे.