अनंत जाधव
सावंतवाडी : सांगली जिल्ह्य़ातील मिरज तालुक्यातील मालगाव तानंग रस्त्यावर बहादूर चाॅद देसाई (54)या मजुराचा डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी सावंतवाडी मधून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघेजण येथील सबनीसवाडा परिसरात असलेल्या एका इमारतीला रंगकाम करत असतनाच पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळ्या आहेत.
यातील संशयिताने गुरूवारी मिरज येथे खून करून रातोरात सावंतवाडीत गाठली खरी पण सावंतवाडीतील मित्रांच्या मोबाईल वरून मिरज येथे केलेल्या सर्पकावरून सांगली पोलिसांनी मोबाईल माग काढत सिंधुदुर्ग पोलिसांना माहिती दिली त्यावरून दोघांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या मध्ये इब्राहिम इंसाफ मुजावर व अश्फाक खान इकबालखान पठाण (दोघे रा.मिरज जि. सांगली) या दोघांचा समावेश आहे.
मालगाव येथील बहाद्दूर देसाई या मजुराचा डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करण्यात आला होता खून केल्यानंतर संशयित आरोपींनी पोबारा केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी सर्वत्र नाकेबंदी करत आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. पण देसाई हे गावात एकटेच राहत असल्याने त्यांना मारहाण करण्यामागे कारण समजू शकत नव्हते. त्यातच सहा महिन्यापूर्वी गावात किरकोळ भांडण झाले होते. त्यावेळी बहादूर चाॅद देसाई याने एकावर ब्लेडने वार केले होते. त्यानंतर दोन गटात वाद झाले होते. यावरून पोलिसात तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यात बहादूर ची पत्नी मुलगा पुणे येथे असतो गावात बहादूर हा एकटाच असल्याने पोलिसांना नेमके कारण समजत नव्हते.
अशातच पोलिसांनी बहादूर यांची कोणाशी दुष्मनी होती का याचा शोध घेत तपासाची चक्रे फिरवली. त्यातच यातील संशयित इब्राहिम इंसाफ मुजावर हा घटनेनंतर गावातून पसार झाला होता. त्याने रातोरात सावंतवाडी गाठली गुरूवारी रात्री सावंतवाडीत आल्यानंतर तो आपल्या ओळखीच्या मित्रांकडे सबनीसवाडा येथे आला तेथे एका इमारतीचे रंगकाम सुरू असून या इमारतीवर तो रंगकाम करत होता.अशातच त्याने अश्फाक पठाण यांच्या मोबाईल वरून मिरज येथे सर्पक केला. याची माहिती मिरज पोलिसांना मिळताच मिरज पोलिसांनी सिंधुदुर्ग पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी मिरज पोलिसांच्या लोकेशन प्रमाणे सबनीसवाडा येथील त्या इमारती कडे जात संशयिताची झाडाझडती घेतली. यात इब्राहिम इंसाफ मुजावर याने आपण रात्रीच सावंतवाडीत आलो असून गुन्ह्यांची कबुली ही दिली आहे. तर अश्फाक पठाण यांच्या मोबाईल वरून सर्पक केल्याने पोलिसांनी त्याला ही ताब्यात घेतले असून या दोघांना सायंकाळी उशिरा मिरज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत कुडाळ पोलिस निरीक्षक निकम याचे मिरज पोलिसांकडून कौतुक करण्यात आले आहे.