दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघातात युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 18:59 IST2020-03-03T18:58:54+5:302020-03-03T18:59:58+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण-टाकेवाडी येथे अवघड वळणावर दुचाकीचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात सुदर्शन सुभाष वाघरे (१८, रा. मधलीवाडी, शेजवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला वैभव विश्वनाथ गाडे (१७, रा. गाडेवाडी, शेजवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हा गंभीर जखमी झाला आहे.

महामार्गावर खारेपाटण-टाकेवाडी येथे दुचाकीला अपघात झाला.
खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण-टाकेवाडी येथे अवघड वळणावर दुचाकीचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात सुदर्शन सुभाष वाघरे (१८, रा. मधलीवाडी, शेजवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला वैभव विश्वनाथ गाडे (१७, रा. गाडेवाडी, शेजवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हा गंभीर जखमी झाला आहे.
खारेपाटण टाकेवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या या अपघाताची माहिती ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर यांनी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र व खारेपाटण पोलीस ठाण्याला दिली. पोलीस कॉन्स्टेबल उध्दव साबळे यांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताची माहिती घेतली.
या अपघातात वाघरे याचा जागीच मृत्यू झाला, तर गाडे हा गंभीर जखमी झाला. येथील सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांनी अपघातग्रस्तांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांनी प्राथमिक उपचार करून जखमी वैभव गाडे याला पुढील उपचारासाठी कणकवली येथे पाठविले. या अपघातातील दोघे युवक राजापूरहून खारेपाटणच्या दिशेने येत असताना रस्त्यानजीक असलेल्या सुरक्षा लोखंडी रॉडवर त्यांची दुचाकी आदळली.
यामध्ये वाघारे याच्या छाती व नाकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर वैभव गाडे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यला कणकवली येथे हलविण्यात आले आहे.
खारेपाटण महाविद्यालयाचा विद्यार्थी
मृत सुदर्शन वाघरे यांच्या नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. वाघरे हा खारेपाटण महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रथम वर्षात शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व बहीण असा परिवार आहे. तर जखमी वैभव गाडे हा येथील प्र. ला. पाटील तांत्रिक महाविद्यालयात अकरावी अॅटो वर्गात शिकत आहे.
खारेपाटण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस. डी. कांबळे व प्रा. दयानंद कोकाटे यांनी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन माहिती घेतली व नातेवाईकांना कल्पना दिली. अधिक तपास पोलीस हवालदार साबळे करीत आहेत.